लाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यात हलका व मध्यम धानाचा हंगाम आटोपतीला आहे. मात्र, पावसाचा व्यत्यय येत असल्याने ओल्या दुष्काळाची भीती आहे. सतत ढगाळ हवामानामुळे धान पिकावर विविध रोगराईचे सावट आहे. तुडतुडा जोर करीत आहे. शेतकरी बांधवांनी लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी काढावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी नसल्याने १०० ते १२० दिवसांच्या कालावधीचे धानाची लागवड बऱ्याच प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे मध्यम कालावधीच्या धानाचे निसवे झालेले आहेत. नियमित पावसामुळे बांधात पाणी साचलेले आहे. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. पाणी काढल्यास धानाचा बुंदा मजबूत होतो. शक्यतो धान लोळत नाही. लोंबी आलेल्या धानाच्या बांधातील पाणी काढल्यास धान पिकावर कीड नियंत्रणासाठी मोठी मदत शक्य असल्याचे मत वर्तवले जात आहे.ज्या शेतकऱ्याकडे भारी अर्थात १२० दिवसाच्या पुढचे धान आहेत त्यांच्याकडे स्वतंत्र सिंचन व्यवस्था असते. त्यामुळे त्यांनीसुद्धा पाणी बांधून ठेवू नये. पालांदूर व परिसरात काही शेतकऱ्यांच्या शेतात तुडतुड्याची लागण झालेली आहे. कीटकनाशक फवारून लाभ मिळत नसल्याचा सूर शेतकऱ्यांनी ऐकविला आहे. त्यावर कृषी तज्ज्ञांच्या मते, शून्य खर्चातील स्वतःच्या अधिकारातील उपाययोजना करीत तुडतुड्याकरिता प्रयत्न करावे. सिंचन सुविधेतील शेतकऱ्यांनी बांधातील पाणी प्रवाहित ठेवावे.
फवारणीसाठी वापरात येणारा पाणी स्वच्छ असावा. शक्यतो सायंकाळच्या वेळेस फवारणी करावी. शिफारसीनुसार कीडनाशकाची मात्रा व पाण्याचे प्रमाण नियोजित असावे. गरजेपेक्षा कमी-अधिक मात्रेत कीडनाशक फवारू नये. लोंबी आल्यानंतर महिनाभरात ओलाव्याने धान परिपक्व होतो. त्यामुळे बांधात पाण्याची मात्रा ठेवू नये. नियमितपणे बांधात उतरून पिकाचे निरीक्षण करावे. फवारणी करण्यापूर्वी हवामान खात्याचा अंदाजसुद्धा लक्षात घ्यावा.-सुधीर धकाते, कृषीतज्ज्ञ, भंडारा.