लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर: शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत मागील काही महिन्यांपूर्वी निर्माण सौर ऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजनेच्या दोषयुक्त मोटारपंपामुळे मागील एक महिन्यापासून तालुक्यातील मालदा गावात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. याप्रकरणी शासन व प्रशासनाने तत्काळ दाखल घेऊन पाणीपुरवठा योजनेंतर्गत नियमितरीत्या पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याच्या मागणीला घेऊन स्थानिक मालदा येथील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आशयाचे निवेदन लाखांदूर पंचायत समितीच्या बीडीओंना देण्यात आले आहे.
तालुक्यातील मुर्झा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मालदा गावात ३२५ लोकसंख्या आहे. या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पर्याप्त सुविधा होण्यासाठी मागील २ वर्षांपूर्वी तब्बल २४.८४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित मंजूर या पाणीपुरवठा योजनेचे मागील काही महिन्यांपूर्वी बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
बांधकाम अंतर्गत हर घर जल योजनेनुसार मालदा येथील ८० कुटुंबांना नळ कनेक्शन देखील देण्यात आले आहे. या कनेक्शन अंतर्गत मागील काही महिन्यापर्यंत पाणीपुरवठा योजनेतून नियमितरीत्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. मात्र मागील एक महिन्यापूर्वी पाणीपुरवठा योजनेचा बांधकामकर्त्या ठेकेदाराने सौर ऊर्जेवर आधारित मोटारपंप बदलवून अन्य दोषयुक्त मोटारपंप लावल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एक महिन्यापासून मालदावासीयांना पाणी पुरवठा योजनेतून पर्याप्त स्वरूपात पिण्याचा पाणी उपलब्ध होत नाही.
अन्यथा घागर मोर्चा काढणार याप्रकरणी मालदा येथील नागरिकांनी संताप व्यक्त करीत तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. मागणीनुसार पुढील १-२ दिवसांत आवश्यक कार्यवाही न केल्यास स्थानिक लाखांदूरच्या पंचायत समिती कार्यालयात घागर मोर्चा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या इशाराचे निवेदन लाखांदूर पंचायत समितीचे बीडीओ खुणे यांना देतेवेळी मंगेश ठाकरे, शुभम नेवारे, तेजस बोकडे, रोहित राऊत, विजय राऊत, दुधराम शहारे, श्रीहरी राऊत, तुरसा नेवारेसह शेकडो नागरिक उपस्थित होते.