पालांदूर : पाणी म्हणजे जीवन आहे. प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून गावागावांत बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लाखनी तालुक्यातील किटाडी येथील गोड पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेलला तब्बल वर्षभरापासून गढूळ पाणी येत असून, अजूनही नादुरुस्त आहे. परिणामी भर उन्हाळ्यात पाणी टंचाईत आणखी भर पडली आहे.
पाणीटंचाई दूर करण्याकरिता प्रभाग २मध्ये नवे स्रोत निर्माण करणे नितांत गरजेचे आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच प्रभाग दोनमधील सार्वजनिक बोअरवेलला गढूळ पाणी येत आहे. बोअरवेल असलेल्या परिसरात काही घरी खासगी विहिरी आहेत. मात्र, शेजारी बऱ्याच घरी पाण्याचे वयक्तिक स्रोत नसल्याने गोरगरिबांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात धावपळ करावी लागते. प्रभाग दोनच्या नागरिकांनी बोअरवेल दुरुस्तीविषयी ग्रामपंचायतीला वेळोवेळी माहिती देऊनही, तात्पुरती दुरुस्ती करण्याचा देखावा करीत खर्च मोठा असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले. मात्र, बारा महिन्यांचा काळ लोटूनही सदर गढूळ पाण्याची बोअरवेल अजूनही दुरुस्त करण्यात आलेली नाही. बोअरवेल गोड पाण्याची म्हणून अख्ख्या किटाडी परिसरात सुपरिचित असल्याने ग्रामस्थांची नियमितपणे सुमार गर्दी असायची. या बोअरवेलच्या पाण्यावर अर्ध्यापेक्षा अधिक गाव आपली तहान भागवित होते. मात्र, आता गढूळ पाण्यामुळे बोअरवेल नादुरूस्त आहे. भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता, ग्रामपंचायतीने तत्काळ दुरुस्ती सुचवावी, अशी ग्रामस्थांची कळकळीची मागणी आहे. मात्र, ग्रामपंचायतीने सदर बोअरवेलचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याने पाण्याचा वापर करू नये, अशी सूचना ग्रामस्थांना केली आहे. भर उन्हाळ्यात विहिरी व बोअरवेलचे पाणी तळापर्यंत गेले आहे. परिणामी उन्हाळ्यात पिण्याचे गोड पाणी आणण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. प्रसंगी शेतशिवारातील सिंचनातूनही येणारे पाणी पिण्यासाठी आणावे लागते. स्थानिक प्रशासनाने पाणीटंचाईच्या प्रभागात तत्काळ पावले उचलत पाणी व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी पुढे आली आहे. गोड पाण्याची बोअरवेल दुरुस्तीकरिता मोठ्या खर्चाची बाब असल्याचे सांगण्यात आले. तो खर्च वरिष्ठ स्तरावरून करीत स्थानिकांची तहान शांत करावी. प्राथमिक स्तरातली पाण्याची समस्या अत्यंत महत्त्वाची आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलत मिळेल त्या मार्गाने निधीची तरतूद करीत बोअरवेलची दुरुस्ती करावी, अथवा नवी बोअरवेल तयार करावी.