संतोष जाधवरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सिंचनातून समृद्धी आणि पाण्याची बचत व्हावी, यासाठी राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, आता ८० टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. पूर्वी ४५ ते ५५ टक्के अनुदान या योजनेसाठी दिले जात होते. राज्य शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील ३५२ तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संचाकरिता अनुदान दिले जाते. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्चाच्या ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते. शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २५ टक्के पूरक तर इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना ८० टक्के वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी आपले अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करून सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. यासाठी ठिबक सिंचन कंपनीतर्फे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष योजनेची फलश्रुती पाहण्यासाठी भंडारा जिल्हा कृषी विभागातर्फे तालुकास्तरावर प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक अरुण बलसाणे, भंडारा उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, साकोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मोहाडीचे शिवाजी मिरासे, पवनीचे आदित्य घोगरे, साकोलीचे सागर ढवळे पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले जात आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज- सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा. टॅगवर क्लिक करुन सिंचन साधने सुविधावर क्लिक करुन समोरचा पर्याय निवडा. त्यानंतर जिल्हा, तालुका, गावासह वैयक्तिक माहिती भरा. ही माहिती भरून झाल्यानंतर मुख्य घटकात सिंचन साधन सुविधा हा घटक निवडावा. यानंतर माहिती पूर्ण भरा व ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहे, त्याची माहिती भरा. यानंतर संमतीशिवाय मी योजनेचा लाभ घेणार नाही, अशी नोंद करावी. यानंतर भरलेली माहिती सेव्ह करुन मुख्य मेनूवर जाऊन ऑप्शनवर क्लिक करा. नंतर सर्वात प्रथम ‘अर्ज सादर करा’वर क्लिक करुन तालुका हा ऑप्शन असल्यावर तुम्ही ज्यासाठी अर्ज केला आहे. त्या योजनेचे नाव येईल. यानंतर प्राथमिक प्राधान्य क्रमांक देऊन अटी-शर्ती मान्य असल्याचे नमूद केल्यानंतरच आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे. पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर ऑनलाइन पैसे भरावे लागणार आहेत.
सुक्ष्म सिंचनासाठी राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट ८० टक्के अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा.-अरुण बलसाणे, जिल्हा कृषी अधीक्षक, भंडाराशेती उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक, तुषार सिंचन महत्त्वाचे आहे. सूक्ष्म सिंचन योजनेतून मागेल त्याला ठिबक व स्प्रिंकलरचा लाभ देण्याची हमी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना देण्यात येते. अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याचा कृषी विभागाचा मानस आहे.-मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा