भंडारा : दारुच्या नशेत भाच्याने मामाचा फावड्याने प्रहार करून निर्घृण खून करण्याची घटना भंडारा तालुक्यातील अजिमाबाद येथील वीटभट्टी परिसरात सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी कारधा पोलिसांनी भाच्याला अटक केली आहे. मृतक आणि आरोपी दोघेही छत्तीसगड राज्यातील कामगार आहेत.
राजू गंगादास मनहारे (३३) असे मृताचे नाव आहे. तर सुनीलकुमार छत्तू गीतलहरे (१८) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही सलोनी, ता. पलारी जि. बलोदाबाजार (छत्तीसगड) येथील रहिवासी आहेत. गत काही महिन्यांपासून छत्तीसगड राज्यातील कामगार भंडारा तालुक्यातील अजिमाबाद येथील वीटभट्टीवर कामाला आहेत.
रविवारी साप्ताहिक मजुरी मिळाल्यानंतर त्यांनी बाजारातून मासोळी खरेदी केली. त्यानंतर मामा राजू आणि भाचा सुनीलकुमार यांनी मद्य प्राशन केले. रात्री विटभट्टी परिसरात दारुच्या नशेत दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात सुनीलने वीटभट्टीवर असलेले फावडे हातात घेऊन मामा राजूच्या डोक्यावर आणि पाठीवर प्रहार केले. यात राजू वीटभट्टीवर असलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडला. मात्र दोघेही दारु पिऊन असल्याने कुणी लक्ष दिले नाही.
सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास राजू खड्ड्यातून बाहेर न आल्याने तेथील कामगारांनी त्याला उठविण्याचा मात्र तो निपचित पडून होता. या घटनेची माहिती सिल्ली येथे राहणाऱ्या त्याच्या भावाला दिली. त्यानंतर सरपंच व पोलिस पाटलांना माहिती देण्यात आली. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कारधा पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार राजकुमार थोरात, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत मिसळे, ऋषिकेश चाबूकस्वार यांनी घटनास्थळ गाठले. राजूचा मृत्यू झाल्याची तोपर्यंत खात्री पटली होती.
याप्रकरणी कारधा पोलिसांनी भाचा सुनील गीतलहरे याला अटक करून त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती होताच पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मीता राव यांनी भेट दिली.
रात्रभर मामा राहिला पाण्याच्या खड्ड्यात पडून
रविवारी रात्री मामा आणि भाच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत मामा राजू मनहारे वीटभट्टीजवळ असलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडला. मात्र दारु पिऊन असल्याने कुणीही लक्ष दिले नाही. रात्रभर तो पाण्याच्या खड्ड्यातच पडून राहिला. सकाळी हा प्रकार दिसला. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. रात्रीच त्याला रुग्णालयात नेले असते तर त्याचा जीव वाचला असता, अशी चर्चा आहे.