बॉक्स
भाजी बाजारासाठी पर्यायी जागा
भंडारा शहरात कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने नगर परिषदेने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शहरात भरत असलेल्या भाजी बाजारासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. शहरातील बीटीबी बाजारासमोरील छोटी दुकाने, गांधी चौक, महिला समाज शाळा ते शास्त्री चौक या परिसरातील भाजीपाला दुकाने, फळ दुकाने, बजा बाजार, गुजरी व शहरातील सर्व रस्त्यावर भाजीपाला व फळविक्रीची दुकाने तसेच मिस्कीन टँक ते राजीव गांधी चौक परिसरातील दुकानांसाठी दसरा मैदान, रेल्वे मैदान, राजीव गांधी चौकातील गणेश शाळा आणि मुस्लिम लायब्ररी चौकातील तुरस्कर गार्डन येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी या ठिकाणी आपली दुकाने लावावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी विनोज जाधव यांनी सांगितले.
बॉक्स
भंडाऱ्यातील घरांचे बांधकाम थांबविले
ब्रेक द चेन अंतर्गत घोषित संचारबंदीत बांधकामासाठी बाहेरून मजूर आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. बांधकामावर असलेल्या मजुरांची निवासी व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी करण्याचे आदेश आहे. त्यानुसार भंडारा नगर परिषदेच्या पथकाने शहरातील सुमारे ३० घरांचे बांधकाम थांबविले आहे. याउपरही घराचे बांधकाम कुणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश नगर परिषदेने दिले आहे.
बॉक्स
बाहेर निघण्यासाठी अनंत कारणे
संचारबंदी काळातही बाहेर निघण्यासाठी अनेकांची धडपड दिसत होती. शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली तरी काही जण शहरात फेरफटका मारताना दिसत होते. पोलिसांनी अशांना थांबविले तर कारणांचा पाढाच वाचला जात होता. कोणी किराणा आणण्याचे कारण तर कुणी भाजीपाला अशी कारणे सांगून शहरात फिरताना दिसत होते. विशेष म्हणजे कालपर्यंत संचारबंदी नसताना आज अनेकांच्या घरातील साहित्य संपले कसे असा सवाल पोलिसांना पडला होता.
बॉक्स
जिल्हाभरात संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, मोहाडी, तुमसर या तालुका ठिकाणासह ग्रामीण भागातही संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी होती.