लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ब्रेक द चेन अंतर्गत घोषित संचारबंदीची भंडारा शहरासह जिल्ह्यात कडक अंमलबजावणी केली जात असून गुरुवारी शहरातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. सकाळी रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी सज्जड दम दिल्यानंतर संपूर्ण शहरातील रस्ते निर्मनुष्य झाल्यागत दिसत होते. दरम्यान नगर परिषदेच्या पथकाने विविध ठिकाणी कारवाई केली तर अनेक वॉर्डात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली. जिल्ह्यात बुधवारी रात्री ८ वाजतापासून संचारबंदी घोषित झाली. गुरुवारी सकाळी जीवनावश्यक वस्तुूची दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद होती. मात्र सकाळच्या वेळी काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसत होते. अशांना पोलिस पथकाने सज्जड दम देऊन घरी पाठविले. तसेच शहरातील शास्त्री चौक, राजीव गांधी चौक, गांधी चौक, खात रोडवरील खांब तलावाजवळ पोलिसांनी बॅरिकेट्स लावून प्रत्येकाची तपासणी सुरू केली. खांब तलाव येथे बाहेरगावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची विचारपूस करूनच शहरात सोडले जात होते. पोलिसांचे वाहनही शहरभर गस्त घालताना दिसत होते. यामुळे शहरातील मोठा बाजार, मेन लाईन, बसस्थानक परिसर, त्रिमूर्ती चौक, राजीव गांधी चौक, शास्त्री चौक, खात रोड सर्व भागातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. राष्ट्रीय महामार्गावरून वाहनांची तेवढी वर्दळ सुरू होती. नगरपरिषद आणि स्थानिक पोलिसांच्यावतीने शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने तेवढी सुरू होती. शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांनीही या संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरी भागात कडकडीत बंद असले तरी ग्रामीण भागात मात्र त्याचा फारसा परिणाम दिसत नव्हता. ३० एप्रिलपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे.
भाजी बाजाराची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ भंडारा शहरात कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने नगर परिषदेने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शहरात भरत असलेल्या भाजी बाजारासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. भाजी बाजाराची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत राहणार आहे. शहरातील बीटीबी बाजारासमोरील छोटी दुकाने, गांधी चौक, महिला समाज शाळा ते शास्त्री चौक या परिसरातील भाजीपाला दुकाने, फळ दुकाने, बजा बाजार, गुजरी व शहरातील सर्व रस्त्यावर भाजीपाला व फळविक्रीची दुकाने तसेच मिस्कीन टँक ते राजीव गांधी चौक परिसरातील दुकानांसाठी दसरा मैदान, रेल्वे मैदान, राजीव गांधी चौकातील गणेश शाळा आणि मुस्लिम लायब्ररी चौकातील तुरस्कर गार्डन येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. विक्रेत्यांनी या ठिकाणी दुकाने लावावी अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी विनोज जाधव यांनी सांगितले.
जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, मोहाडी, तुमसर या तालुका ठिकाणासह ग्रामीण भागातही संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी होती. मात्र ग्रामीण भागात हवा तसा प्रतिसाद या संचारबंदीला मिळत नसल्याचे दिसत होते.
बाहेर निघण्यासाठी अनंत कारणे संचारबंदी काळातही बाहेर निघण्यासाठी अनेकांची धडपड दिसत होती. शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली तरी काही जण शहरात फेरफटका मारताना दिसत होते. पोलिसांनी अशांना थांबविले तर कारणांचा पाढाच वाचला जात होता. कोणी किराणा आणण्याचे कारण तर कुणी भाजीपाला अशी कारणे सांगून शहरात फिरताना दिसत होते. विशेष म्हणजे कालपर्यंत संचारबंदी नसताना आज अनेकांच्या घरातील साहित्य संपले कसे असा सवाल पोलिसांना पडला होता. ब्रेक द चेन अंतर्गत घोषित संचारबंदीत बांधकामासाठी बाहेरून मजूर आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. बांधकामावर असलेल्या मजुरांची निवासी व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी करण्याचे आदेश आहे. त्यानुसार भंडारा नगर परिषदेच्या पथकाने शहरातील सुमारे ३० घरांचे बांधकाम थांबविले आहे. याउपरही घराचे बांधकाम कुणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश नगर परिषदेने दिले आहे.