शुद्ध पाणी द्या : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, जलवाहिनी वारंवार लिकेजरविंद्र चन्नेकर । लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील लोकसंख्या ३५०० च्या घरात आहे. गावात नळयोजनेचे दोन जलकुंभ असून त्याद्वारे जवळपास ५०० कुटुंबाना पाणीपुरवठा केला जातो. मात्र पावसाळा सुरु होताच नागरिकांना नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे. नळाला सोडण्यास येत असलेले पाणी काळपट मातीमिश्रीत व पाण्याला वास येत असून असे पाणी पिऊन ग्रामस्थ स्वत:च किटकजन्य व जलजन्य आजाराला निमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. मात्र पर्याय नसल्यामुळे प्यावे लागते, अशी ग्रामस्थांची ओरड आहे. बारव्हा - जैतपूर या दोन्ही गावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा २० वर्षापासून करण्यात येत होता. या पाणीपुरवठा योजनेतून दोन्ही गावाला सुरळीत पाणी पुरवठा केला जात होता. मात्र एका जनप्रतिनिधीच्या शब्दाला मोल देत तत्कालीन ग्रामपचांयत पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या विरोधाला झुगारुन ४६ लक्ष रुपये किंमतीची भारत निर्माण पाणी पुरवठा नळ योजना मंजूर केली. याचे काम जवळच्या कंत्राटदाराला देण्यात आले. याला ग्रामसभेत ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. भारत निर्माण पाणीपुरवठा नळ योजना आजही अपूर्ण असल्याची ओरड आहे. अभियंता, तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी काम पूर्ण झाल्याचे जाहीर करुन कंत्राटदाराने गावातून पोबारा केला. या नळयोजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची गावात चर्चा आहे. पाणीपुरवठा करण्याकरिता घालण्यात आलेली प्लॉस्टीकची जलवाहिनीही निकृष्ट दर्जाची आहे. तसेच जलवाहिनी घालण्याकरिता रेतीचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने दोन ते तीन दिवस पाणी पुरवठा बंद केला जातो. पाणीपुरवठा सुरु झाल्यास नागरिकांना दूषित पाणी वितरीत होतो. हा नित्याचाच प्रकार झाला असून नळ योजनेला जलश्द्धीकरणाची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. नदीचे पाणी दूषित झाले आहे. आणि तसेच पाणी नळाद्वारे नागरिकांपर्यत पोहचविले जात आहेत आणि बरेचसे नागरिक पाणी शुध्द करुन पीत नसल्याने साथीचे आजाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. काही अज्ञात कुटुंबीय दूषित पाण्याच्या दुष्परिणामांची तमा न बाळगता दुषित पाणी पिऊन आपली तृष्णा भागवित आहेत. बारव्हा आरोग्य केंद्रात जवळपास २००रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. दूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ या सारख्या आजार होण्याची भिती निर्माण झाली आहे. विशेषत: लहान बालकांना या पाण्याचे दुष्परिणाम जाणवित आहे. असला प्रकार मागील एक महिन्यापासून सुरु असून याकडे स्थानिक प्रशासन मात्र चुप्पी साधून बसल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बारव्हा येथे होतोय दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 1:17 AM