धानोली शिवारातील घटना : वनविभागाने राबविले रेस्क्यू आॅपरेशन पवनी : धानोरी गावानजीकच्या शेलारीच्या जंगलातून दोन युवक जात होते. यावेळी परिसरात भटकंती करीत असलेला वाघ त्यांच्या मागे धावला. यामुळे दोघांनी समयसूचकता दाखवित जीव वाचविण्यासाठी झाडावर चढले. दरम्यान, वाघ झाडाखाली घुटमळत होता. याची माहिती मिळताच वनविभागाने रेस्क्यु आॅपरेशन राबवून दोघांचीही सुखरूप सुटका केली.रविवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. पालोरा (मेंढा) येथील सिलमा विठोबा चौधरी (१८) व सचिन मेश्राम (२२) हे दोघे मित्र शेलारीच्या जंगलातून रस्त्याने जात होते. यावेळी जंगल परिसरात फिरत असलेला वाघ त्यांच्या मागे धावला. अचानक वाघ धावल्याने दोघांचीही भंबेरी उडाली व तेवढ्याच समयसूचकतेने दोघेही जीव वाचविण्यासाठी लगतच्या झाडावर चढले. दोघेही झाडावर चढले असता, वाघोबाने युवक चढलेल्या झाडाखाली ठाण मांडले. सावज हेरण्यासाठी वाघ झाडाखाली तर वाघापासून वाचण्यासाठी युवक झाडावर असा चित्तथरारक प्रसंग युवकांनी सुमारे दोन तास अनुभवला. दरम्यान युवकांनी मोबाईलवरून घटनेची माहिती धानोरी येथील परिचित व्यक्तीला दिली. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली व असंख्य नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच गावकरी घटनास्थळी पोहचले. झाडाजवळ वाघ असल्याने वनविभागाने रेस्क्यु आॅपरेशन राबवित वाघाला हुसकावून लावले. तब्बल दोन तासांनतर दोन्ही युवकांची वाघाच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. याकरिता वनक्षेत्राधिकारी डी.एन. बारई, बीट रक्षक ए.व्ही. खेत्रे, पांढरे, हटकर, वनमजूर आर.एम. कुर्झेकर, रामटेके व गावकऱ्यांनी प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)
वाघाच्या भीतीने दोन तरूण दोन तास झाडावर
By admin | Published: September 08, 2015 12:30 AM