संजय साठवणे
साकोली : पर्यटन हा शब्द मुळातच आनंद देणारा आहे. अनेक पर्यटनस्थळांना इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. जमिनीच्या एखाद्या भूभागावर नैसर्गिक सौंदर्याचा आधार घेऊन त्या ठिकाणाला पर्यटन क्षेत्र घोषित करतात. पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र निधीअभावी भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उपेक्षितच आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे सन १९७० पासून जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात झाली. २७ सप्टेंबर १९८० पासून पहिला जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात आला. पर्यटन क्षेत्राचा प्रचार, प्रसार व्हावा आणि योग्य वेळी योग्य निधी उपलब्ध करून लोकोपयोगी विकास साधावा, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. पर्यटन क्षेत्राच्या जोरावर कोणत्याही गावाची, शहराची, राज्याची किंवा एखाद्या देशाची नेत्रदीपक प्रगती होऊ शकते. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो. गरीब कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पर्यटनस्थळांचा मोठा वाटा राहिलेला आहे.
बॉक्स
जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळे
पर्यटनाच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्य़ाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सिंधपुरी बौद्ध विहार पवनी, पवनीचा किल्ला, आंबागड किल्ला, सानगडी किल्ला, रावणवाडी तलाव, चांदपूर तलाव, शिवनीबांध जलतरण तलाव, कोरंभी मंदिर, इंदिरासागर धरण, कोका वन्यजीव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य आणि पवनी - कह्रांडला अभयारण्य इत्यादी अनेक ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत.
कोरोनामुळे रोजगार मिळेना
कोरोनाचे संकट आल्यामुळे लाखो पर्यटकांनी अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे. याचा परिणाम गाईड, जिप्सीचालक, गेटजवळच्या लहान मोठ्या दुकानदारांवर झालेला आहे. शासनालाही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पर्यटनस्थळाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कोट बॉक्स
पर्यटनस्थळामुळे शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात पैसा जमा होतो. त्यामुळे अशा स्थळांचा सुविधांयुक्त विकास होणे अपेक्षित आहे.
- विनोद भोवते, पर्यटनप्रेमी साकोली.