नवे संकट : परिसरातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शेंडा (कोयलारी) : कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता विजेच्या कमी दाबाचा फटका सहन करावा लागत आहे. वीज विभागाच्या भोंगळ कारभाराने या परिसरातील शेंडा, आपकारीटोला, मसरामटोला, पांढरवानी, कोयलारी, मोहघाटा, सालईटोला, कन्हारपायली, उशिखेडा, प्रधानटोला, कोहळीटोला, नरेटीटोला व पुतळी येथील शेतकऱ्यांचे २०० हेक्टर क्षेत्रातील धानपिक करपले आहे. याची तक्रार देवरी येथील उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना वारंवार करण्यात आली. मात्र यावर तोडगा न काढता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांवर नव्या संकटाला सामोरे जाण्याची पाळी आली आहे.सततच्या दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी यावर्षी या परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. सध्या धान गर्भात येत आहे. अशावेळी धानाला पाण्याची नितांत आवश्यकता असते. परंतु विजेचा दाब खूपच कमी असल्याने मोटारी सुरूच होत नाहीत. त्यामुळे धान पीक करपत आहे. याची माहिती वीज विभागाच्या अभियंत्यांना वारंवार देण्यात आली. यावर तोडगा न काढता कोणते ना कोणते कारण पुढे करुन ते टोलवा टोलवी करीत आहेत. मार्च महिना संपला असून एप्रिल महिन्याला सुरुवात आली. धान पिकासाठी एप्रिल महिन्यातच पाण्याची अधिक गरज भासते. विजेचा दाबच अत्यल्प असल्याने मोटारी सुरूच होत नाहीत. पाण्याअभावी धान पीक वाळत असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कुटुंबानिशी शेतात राबून शेतकरी रक्ताचे पाणी करतो. धानाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँका, सोसायटी तसेच आपसात उसनवारीची रक्कम घेऊन शेतात ओतून टाकली. अशातच पाण्याअभावी धानपिक नष्ट होत असल्याच्या मार्गावर आहे. कर्जाची परतफेड कशी होईल या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांचा वाली कोण? असा सवाल आता विचारला जाता आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या कोणापुढे मांडाव्या हे कळायला मार्ग नाही. शेवटचा उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे गटनेता गंगाधर परशुरामकर यांच्या समवेत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणीवर तासभर चर्चा केली व लेखी निवेदन दिले. यावेळी माजी सरपंच आनंदराव ईळपाते, मुकुंदराव कापगते, बाबुलाल सयाम, किशोर लांजेवार व नरेश टेंभरे हे होते. यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. पांढरी परिसरातही पीक करपले पांढरी : परिसरातील सितेपार, मालीजुंगा, धानोरी, कोसमतोंडी, मुरपार, लेंडेझरी, चिचटला, रेंगेपार, मुंडीपार आदि गावांत काही प्रमाणात चुलबंद जलाशयातून पाणी पुरवठा होत असतो. तर काही शेतकऱ्यांनी वीज विभागाकडून कनेक्शन घेतले आहे. सौंदड येथील मुख्य विद्युत कार्यालयातून वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक पाण्याअभावी करपू लागले आहे. प्राथमिक अवस्थेतच पिकांची वाढ पाण्याअभावी खुंटलेली वाटत आहे. अभियंता बडोले यांच्याशी बोलले असता त्यांनी दोन दिवसांत निराकरण करु असे सांगितले. परंतु आठ दिवसांचा कालावधी उलटूनही कसलीही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. कोसमतोंडी परिसरातील शेतकरीबांधवांनी परिसरातील सर्व शेतकऱ्यांसह विद्युत अधिकाऱ्यांना बोलावून लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली. काही शेतकऱ्यांनी वीज पुरवठा शेतीकरिता होत नसताना वीज कनेक्शन का दिले असा सवाल केला. (वार्ताहर)शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा वीज क नेक्शन घेऊनही पंपासाठी वीज पुरवठा होत नसेल व पाण्यासाठी अभावी पीक मरत असेल तर वीज कनेक्शनचा फायदा काय असा सवाल आता परिसरातील कृषी पंपधारक शेतकरी करीत आहेत. वीजेचे बील भरून सुद्धा पीक व मरत असल्यास याला जबाबदार कोण असे शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे वीज विभागाने वीज पुरवठ्यात सुधारणा न केल्यास आंदोलन करण्याचा ईशारा अविनाश काशीवार, वामेश्वर टेंभरे, निरज मेश्राम व अन्य शेतकऱ्यांनी दिला आहे.
कमी वीज दाबाने धान पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2017 12:41 AM