ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनियंत्रित वेग आणि नादुरूस्त रस्ते वाहन अपघाताला जबाबदार असले तरी चालकांची अधू दृष्टीही अपघाताचे तेवढेच महत्वाचे कारण ठरू शकते. वाहन चालविण्याचा परवाना घेतल्यानंतर चालकांची आरोग्य तपासणीच होत नसल्याचे वास्तव एका सर्वेक्षणात उघड झाले. चाळीसीपार केलेल्या ७५ टक्के अवजड वाहन चालकांनी कधीच डोळ्यांची तपासणी केली नसल्याचेही पुढे आले आहे. मात्र हा गंभीर विषय परिवहन विभागासह शासनही दृष्टीआड करीत आहे.दररोज कुठे ना कुठे अपघात होतो. प्राणहानी होऊन अनेकांना कायमचे अपंगत्वही येते. अपघाताला अनियंत्रित वेग अथवा नादुरूस्त रस्ता हेच कारण पुढे केले जाते. अपघाताच्या विविध कारणात वाहन चालकांची दृष्टीही तेवढीच महत्वाची ठरते. भंडारा येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. योगेश जिभकाटे यांनी महामार्गावर धावणाऱ्या ट्रक आणि अवजड वाहन चालकांचे सर्वेक्षण केले. त्यातून पुढे आलेले वास्तव अत्यंत धक्कादायक आहे. २०० चालकांपैकी १५२ चालकांनी कधीच नेत्रतपासणी केली नसल्याचे दिसून आले. साधारणत: चाळीसीपार केल्यानंतर डोळ्याचे विकार सुरू होतात. नियमित तपासणी आणि चष्मा लावल्यास त्यावर नियंत्रण मिळविता येते. मात्र अहोरात्र रस्त्यावरून धावणाºया वाहन चालकांना नेत्र तपासणीसाठी वेळच मिळत नाही. अनेकांना तर आपल्यात दृष्टीदोष आहे याचीही जाणिव नसते. त्यातून डोळ्याचे आजार बळावत जातात आणि एखाद्या मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरतात.काचबिंदू, मोतीबिंदू, बुबुळाचे आजार, एका डोळ्याने अधू, दूरदृष्टी दोष असे एका ना अनेक नेत्र विकार चाळीसीपार केलेल्या वाहन चालकांत दिसून येतात. काचबिंदू असलेल्या व्यक्तीला साईडचे दिसत नाही, मोतीबिंदू असलेला व्यक्ती प्रखर प्रकाशाने गोंधळून जातो. लांब अंतरावरील त्याला दिसत नाही. अनेकदा डबल इमेज दिसतात. डॉ. योगेश जिभकाटे यांनी केलेल्या सर्वेक्षणातील तपासणीत चाळीसीपार केलेल्या दहा टक्के चालकांमध्ये साईड व्हीजनचा अभाव दिसून आला. काचबिंदूचे २० टक्के, बुबुळाच्या आजाराचे पाच टक्के तर पडद्याच्या आजारानेग्रस्त दहा टक्के वाहन चालक आढळून आले. महत्वाचे म्हणजे ६० टक्केच्यावर चालकांना चष्म्यांचे नंबर आलेले होते. मात्र काही अपवाद वगळता डोळ्याच्या अरोग्याबाबत कुणीही गंभीर दिसून आले नाही. यातूनच अनेकदा वाहन चालकांची दृष्टी अपघातास काणीभूत ठरते.परिवाहन अधिकारी वाहनांची तपसणी करताना ‘पीयूसी’ प्रमाणपत्रासह वाहनांची कागदपत्रे तपासतात. एकादे प्रमाणपत्र नसले तर दंड आकारला जातो. मात्र परिवहन अधिकारी कधीच वाहन चालकाच्या आरोग्याबाबत विचारत नाही. खरे तर दरवर्षी वाहन चालकांची नेत्र तपासणी होणे आवश्यक आहे. ‘पीयूसी’सारखीच नेत्रतपासणीही सक्तीची करण्याची आवश्यकता आहे.फिटनेस सर्टिफिकेटचा गोरखधंदाआरटीओ कार्यालयात वाहन चालविण्याचा परवाना काढताना फिटनेस सर्टिफिकेट द्यावे लागते. राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयासमोर हे सर्टिफिकेट कसे मिळते हे सांगण्याची गरज नाही. कार्यालयाबाहेर एखादा डॉक्टर टेबल-खुर्ची लावून बसलेला असतो. त्याठिकाणी दलालाच्या माध्यमातून तो अवघ्या ५० ते १०० रूपयात सर्टिफिकेट देतो. हा गोरखधंदा वर्षानुवर्ष सुरू आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यातून अनफिट व्यक्तीलाही वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकतो.
अपघातांना चालकांची अधू ‘दृष्टी’ कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 4:13 PM
अनियंत्रित वेग आणि नादुरूस्त रस्ते वाहन अपघाताला जबाबदार असले तरी चालकांची अधू दृष्टीही अपघाताचे तेवढेच महत्वाचे कारण ठरू शकते.
ठळक मुद्देनेत्र तपासणीचा अभाव वाहन चालकांच्या सर्वेक्षणातील वास्तव