मुंडीकोटा : घाटकुरोडा वैनगंगा नदीच्या घाटावरून पावसाळा सुरू झाला असतानाही रेतीघाट सुरूच असल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे मुंडीकोटा परिसरातील सर्वच रस्ते उखडले असून रहदारीसाठी अयोग्य सिद्ध होत आहेत. घाटकुरोडा माता मंदिर रेतीघाटाचा महसूल विभाग तिरोडा यांनी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात लिलाव केला होता. दरवर्षी रेतीघाट दोन राहत होते. पण यावर्षी एकच रेतीघाट सुरू आहे. त्यामुळे रेतीघाट कंत्राटदारांची चांदी झाली आहे. रेतीचे ट्रक निघण्यासाठी या कंत्राटदारांनी यावर्षी नवीनच रस्ता शोधला आहे. तो रस्ता घाटकुरोडा गावाबाहेरुन निघत असून एलोरा पेपर मिल (देव्हाडा) या गावाशी जोडला आहे. तिथे सदर रस्ता नागपूर ते गोंदिया राष्ट्रीय महामार्गाला जोडलेला असून रेती भरलेले ट्रक सतत नागपूर ते गोंदियाकडे धावत असतात. सद्यस्थितीत पावसाचे दिवस आहेत. घाटकुरोडा ते देव्हाडा या रस्त्याच्या मध्यभागी एक नाला पडतो. आता सदर रस्ता पूर्णपणे फुटला असून जीर्ण झालेला आहे. त्यामुळे घाटकुरोडा ते देव्हाडा या रस्त्यांनी रेती भरून जाणारे ट्रक बंद झालेले दिसत आहे. मात्र आता पावसाळ्यातही रेती भरलेले ट्रक जाणे दुसऱ्या रस्त्यांनी सुरूच आहे. कंत्राटदारांनी एका शेतकऱ्याच्या शेतात रेतीचा साठा भरुन ठेवलेला दिसत आहे. नदी कोरडी असून पूर आलेला नाही. त्यामुळे रेतीघाट सुरुच आहे. हा रस्ता घाटकुरोडा, घोगरा, पाटीलटोला, देव्हाडा (एलोरा पेपर मिल) मार्गे सरळ नागपूर ते गोंदियाकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडला गेला असून असून याच रस्त्यांनी नेहमी ट्रक धावत असतात. घाटकुरोडा गावातून सरळ ट्रक निघून घोगरा येथील रस्त्यांनी देव्हाड्याकडे निघतात. घाटकुरोडा गावातून ट्रक निघताना एकेरी रस्ता असल्यामुळे येथील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. सध्या शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शाळकरी मुले याच रस्त्यांनी शाळेत जातात. अनेक नागरिकांना ट्रक जाईपर्यंत रस्त्याच्या कडेला थांबावे लागते. त्यामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ््याचे दिवस असल्यामुळे घाटकुरोडा, घोगरा, पाटीलटोला, देव्हाडा (पेपर मिल) हे रस्ते रेती भरलेल्या ट्रकच्या जड वाहतुकीमुळे जीर्ण झाले असून फुटलेल्या अवस्थेत आहेत. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते. खड्ड्यातील साचलेले खराब पाणी ट्रक जातेवेळी अनेक नागरिकांच्या अंगावर उडते व कपडे खराब होतात. ट्रकांची ये-जा रात्री व दिवसा सुरूच असते. त्यामुळे रस्त्याच्या शेजारी घरे असल्यास ट्रकच्या आवाजामुळे नागरिकांची झोप उडते. या प्रकारामुळे आजारी होण्याची शक्यता निर्माण झालेली दिसत आहे. विशेष म्हणजे तुमसर आगाराची तुमसर ते तिरोडा व्हाया घाटकुरोडा मार्गे एसटी बस सेवा सुरु आहे. पण रस्त्याअभावी ही बस आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशा जड वाहतुकीमुळे घाटकुरोडा, घोगरा, पाटीलटोला, देव्हाडा येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरुन कोणतीच वाहने चालविणे कठिण झाले आहे. हे रस्ते पार करताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत असून रस्ते मृत्यूला आमंत्रण देणारे ठरत आहेत. या रस्त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांनी चौकशी करुन या रस्त्यांची दयनीय अवस्था दूर करण्याची मागणी जनतेने केली आहे. (वार्ताहर)
रेती घाटामुळे ग्रामीण भागातील रस्ते झाले जीर्ण
By admin | Published: July 13, 2016 1:39 AM