राहुल भुतांगे
०६ लोक २१
तुमसर : दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा काळात कष्टकरी, मजूर, बेघर गरीब असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. तर, केंद्रावरून देण्यात येणाऱ्या थाळ्यांची संख्या शासनाने वाढविण्याचा निर्णय घेतला असून १५ एप्रिलपासून आतापर्यंत तुमसर शहरातील २ केंद्रावर ३ हजार १५० शिवभोजन थाळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. आता लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळी गोरगरिबांसाठी आधार ठरत आहे.
कोरोनाचा उद्रेक झाल्याने संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनचा परिणाम थेट लोकांच्या रोजगार आणि व्यवसायांवर झाला. हातावर पोट असणाऱ्यांची स्थिती अधिकच बिकट झाली. मात्र अशा सर्वांच्या मदतीला धावून आली ती शिवभोजन योजनेची थाळी. तुमसर शहरातील बाजारपेठ येथील श्यामतारा हॉटेल येथील व बसस्थानकासमोरील बचतगट शिवभोजन या दोन्ही केंद्रांवर पन्नास पन्नास शिवभोजन थाळ्यांची व्यवस्था करण्यात आली होती मात्र शासनाने त्या संख्येत वाढ करुन दोन्ही केंद्र मिळून ही संख्या १०० वरून १५० केली आहे. १५ एप्रिलपासून या केंद्रांवरून आतापर्यंत ३ हजार १५० थाळ्यांनी अनेक गरजूंची भूक भागवली आहे.
आघाडी शासनाची शिवभोजन थाळी योजना आरंभापासून सर्वांना आधार देणारी ठरली आहे. थाळीत वाटीभर वरण, एक भाजी, भात आणि चपाती या शिवभोजन थाळीच्या माध्यमातून दिली जाते. कोरोना विषाणूच्या उद्रेक काळात उपलब्ध आणि सकस अन्न या निमित्ताने शहरातील गरजू आणि गरीब जनतेला देण्याचे काम शिवभोजन थाळी योजनेच्या रूपाने सुरू आहे. या योजनेने अनेकांची भूक भागवली जात आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्रावर दिवसेंदिवस गर्दी वाढू लागलीय. मात्र, दिवसाला १५० जणांनाच थाळीचा लाभ मिळत असल्याने अनेक जणांना उपाशीपोटी जावं लागतंय, हेदेखील सत्य नाकारता येत नाही. त्यामुळे शिवभोजन केंद्रावरून मिळणाऱ्या थाळींची संख्या आणखी वाढविणे काळाची गरज झाली आहे.