शासन निर्णय : मानसिक आधार मिळण्याचा मार्ग मोकळा मोहाडी : गरोदर मातांच्या प्रसूती प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण व्हावी आणि प्रसूती सुरक्षित व आरोग्यदायी होण्यासाठी यापुढे आता प्रसूती दरम्यानच्या काळात मातेसोबत तिची मदतनिस उपस्थित राहण्यास अनुमती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यापुढे मातेला थेट प्रसूतिगृहापर्यंत आपल्या जन्म मदतनिसाच्या उपस्थितीने मानसिक आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शासकीय रुग्णालयात सध्या प्रसूतिगृहात (कक्षात) केवळ वैद्यकीय अधिकारी परिचारिका व सफाई कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला वा नातेवाईकांना प्रवेश देण्यात येत नाही. ज्या काळात गरोदर महिलांना मानसिक आधाराची गरज असते. नेमक्या त्याच काळात ती माता प्रसूती कक्षात एकाकीपण अनुभवत असते. हे एकाकीपण दूर करण्यासाठी शासनाच्या नव्या निर्णयानुसार संबंधित गरोदर महिलेच्या एका जन्म मदतनिसाला गर्भधारणेपासून थेट प्रसूतीपर्यंत तिच्यासोबत राहता येणार आहे. यामुळे मातेला बाळंतपणाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुटुंबाचा सहभाग मिळण्याची संधी तर उपलब्ध होईलच. शिवाय बाळंतपण व प्रसूती पश्चात कालावधीमध्ये मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी मदत होणार आहे. गरोदरपणात मातेला मदत करण्यासाठी कोण असावा, यासाठी शासनाने एक निश्चित कार्यपद्धती निर्धारित केली आहे. यामध्ये मातेची आई, सासू, बहिण, जाऊ वा कुटुंबातील इतर स्त्री ज्यांना बाळंतपणाचा अनुभव आहे. अशा व्यक्तीची मदतनिस म्हणून निवड करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्तीच्या निवडीनंतर तिचे नाव गरोदर महिलेच्या पुस्तकावर नोंद करावे आणि तिला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण शिबिरही आयोजित करावे, आदी सूचनांचा यामध्ये समावेश आहे. संबंधित महिलेला यापुढे थेट प्रसूतीगृहापर्यंत प्रवेश देण्याची तरतुदही या योजनेत असल्याने प्रसूतीचा महत्वाच्या क्षणी ही महिला मातेला मानसिक आधार तर देईलच शिवाय प्रसूतीदरम्यानच्या प्रक्रियेतील पारदर्शकता अधिक स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.गरोदर मातांना बाळंतपणादरम्यान सतत मानसिक आधार, प्रोत्साहन व सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक असते. मातेला असा धीर देण्यास बाळंतपणाचा कालावधी कमी होतो. वेदनाशामक औषधे वैद्यकीय पद्धतीची कमी आवश्यकता भासते. सिझेरीयन, शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी होते. प्रसूती पश्चात उदासीनतेचे प्रमाण कमी होते. स्तनपान लवकर सुरु होऊन बाळाचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. या सर्व बाबी संशोधनात पुढे आल्याने जागतिक संशोधनाचा आधार घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने प्रसूतीच्या काळात मातेला मानसिक आधारासाठी तिच्या प्रसूतीपर्यंत एका मदतनिसांच्या उपस्थितीकडे लक्ष वेधले होते. त्यावर महाराष्ट्र शासनाने पहिले पाऊल टाकून शासन निर्णय कृतीत आणले व टप्प्याटप्प्याने प्रथम जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातही हा निर्णय राबविण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)
प्रसूती काळात महिलेला मिळणार मदतनिसांची साथ
By admin | Published: November 19, 2015 12:25 AM