लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गाेसे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दीड महिन्यात २४५.१३० मीटर जलसाठा झाला असून आठवडाभरात पूर्ण क्षमतेने २४५.५० मीटर जलसाठा करण्याचे नियाेजन आहे. प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ हाेत असल्याने बॅक वाॅटरची समस्या निर्माण झाली असून अनेक शेतशिवारात पाणी शिरले असून रस्तेही पाण्याखाली आले आहेत. भूसंपादनाव्यतिरिक्त कुठपर्यंत पाणी जाणार याची खात्री प्रशासन या माध्यमातून करीत आहे.पवनी तालुक्यातील गाेसे खुर्द येथे राष्ट्रीय प्रकल्प असून या प्रकल्पाचे जवळपास पूर्ण काम झाले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या नियाेजित जलसाठ्यात पुनर्वसनाअभावी वाढ करता येत नव्हती. परंतु आता कागदाेपत्री पुनर्वसन पूर्ण झाल्याने १ नाेव्हेंबरपासून या प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. टप्प्याने पाणी वाढवत १५ डिसेंबरपर्यंत २४५.५० मीटरपर्यंत जलसाठा करण्याचे निर्धारित हाेते. मात्र, १६ डिसेंबरपर्यंत या प्रकल्पात २४५.१३० मीटर जलसाठा झाला हाेता. आता साधारणत: २२ डिसेंबरपर्यंत या प्रकल्पाचा जलसाठा २४५.५० मीटर हाेण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेताच बॅक वाॅटरमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली. भंडारा शहरासह तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवारात पाणी शिरले. रस्ते पाण्याखाली आले. भंडारा शहरातील ग्रामसेवक काॅलनीपर्यंत बॅक वाॅटर आले आहे. वैनगंगेच्या जलसाठ्यातही माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अथांग पाणी पात्रात दिसत असून वैनगंगेचा कारधा येथील लहान पूल पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. गुरुवारी कारधा येथे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी २४५.०७ मीटर नाेंदविण्यात आली. कारधा येथील जुन्या पुलावरुन वाहतूकही बंद करण्यात आली. २४५.५० मीटर जलसाठा झाल्यास विविध समस्याही निर्माण हाेण्याची शक्यता आहे.
बॅक वाॅटरचे सर्वेक्षण करणार गाेसे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ केल्यानंतर २४५.५० मीटर जलसाठा झाल्यावर बॅक वाॅटर कुठपर्यंत जाते, याचे सर्वेक्षण गाेसे पुर्नवसन विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. भूसंपादन झालेल्या व्यतिरिक्त कुठपर्यंत पाणी जाणार याचीही खात्री या निमित्ताने केली जाणार आहे. या बॅकवाॅटरच्या काेणत्या भागाला धाेका आहे याची माहिती घेतली जाईल. याबाबतचा अहवाल जलसंपदा विभागाला साेपविला जाणार आहे.