लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर भंडारा शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र सौहार्दाचे वातारण आणि एकोप्याचे वातावरण दिसून आले. जिल्ह्यात सर्वत्र शांतता आणि सर्व व्यवहार दिवसभर सुरळीत सुरू होते. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वांनीच उत्स्फूर्तपणे स्वागत करीत जिल्ह्यात सामंजस्याची गुढी उभारल्याचे चित्र दिसत होते.अयोध्या प्रकरणाचा काय निर्णय लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सकाळी १०.३० वाजतापासून अनेकजण दूरचित्रवाणी संचापुढे बसल्याचे चित्र दिसत होते. सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याचे सर्वत्र स्वागत होत असल्याचेच दिसून आले. सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत होते. कुणाच्याही चेहऱ्यावर तणाव अथवा भीती दिसत नव्हती. सामान्य व्यवहार सुरू होते. शहरातील जिल्हा परिषद चौक, बसस्थानक चौक, त्रिमुर्ती चौक, राजीव गांधी चौक, गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, शास्त्री चौक आदी भागातील सर्व दुकाने दिवसभर उघडी होती. व्यवहारही नियमितपणे दिसत होते. नेहमीची वर्दळ बाजारपेठेत दिसत होती.पोलिसांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त लावला होता. विशेष म्हणजे शुक्रवारपर्यंत पोलिसांनी दोनही समाजाच्या बैठका ठिकठिकाणी घेतल्या. सर्वप्रथम पोलीस ठाणेस्तरावर त्यानंतर विभागीय स्तरावर बैठक घेण्यात आली. तर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी समाजातील विविध घटकांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले होते. पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले होते. तसेच गस्तीसाठी पथकेही तयार केली होती. परंतु जिल्ह्यातील संयमी नागरिकांमुळे कुठेही अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे पोलिसांवरील ताण शनिवारी आपोआप हलका झाल्याचे दिसत होते. शनिवारी असलेला बंदोबस्त रविवारीसुद्धा कायम राहणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी सांगितले.भंडारा शहरासोबतच जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, साकोली, लाखांदूर, लाखनी, पवनी या तालुक्यातही सर्वांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. जिल्ह्यात कुठेही शांतता भंग होईल, अशी घटना घडली नाही. सोशल माध्यमातही नागरिकांनी अतिशय संयम बाळगल्याचे शनिवारी दिवसभर दिसून येत होते.श्रीराम मंदिरात आरतीअयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर सायंकाळी भंडारा येथील ऐतिहासीक वारसा लाभलेल्या बहिरंगेश्वर देवस्थान परिसरातील श्रीराम मंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत विशेष आरती करण्यात आली. यावेळी चंद्रशेखर रोकडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम मंदिर परिसरात यानिमित्ताने एक हजार दीप प्रज्वलित करण्यात आले होते. श्रीराम मंदिराच्या परिसरात या दिव्यांनी प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण दिवसभर भाविक या मंदिरात नेहमीप्रमाणे दर्शनाला येत असल्याचे चित्र होते. आरतीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अयोध्या निकालानंतर उभारली सांमजस्याची गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 6:00 AM
अयोध्या प्रकरणाचा काय निर्णय लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सकाळी १०.३० वाजतापासून अनेकजण दूरचित्रवाणी संचापुढे बसल्याचे चित्र दिसत होते. सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याचे सर्वत्र स्वागत होत असल्याचेच दिसून आले. सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत होते. कुणाच्याही चेहऱ्यावर तणाव अथवा भीती दिसत नव्हती.
ठळक मुद्देसर्व व्यवहार सुरळीत । सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाचे जिल्हाभर स्वागत