लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात एक लाख ६७ हजार १७२ मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले असून जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींनी ई-मस्टरचा वापर सुरु केला आहे. मजुरांना त्यांची मजुरी थेट बँकेच्या खात्यातून दिली जात असून वेळेत मजुरी वाटपात भंडारा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला स्थानिक क्षेत्रात रोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण क्षेत्राचा विकासासोबतच मजुरांचे स्थलांतरण थांबण्यात मदत झाली आहे. भंडारा जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ३१७ कुटुंबांनी रोजगार मिळण्यासाठी नोंदणी केली असून सर्वांना रोजगार पत्रकाचे वाटप करण्यात आले आहे. सर्व तालुक्यात यावर्षात मजुरांची जास्तीत जास्त मागणी येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले. मोहाडी व भंडारा तालुक्यातील मजुरांना स्थानिक क्षेत्रात काम उपलब्ध होण्यासाठी विशेष लक्ष देऊन सेल्फवर कामे तयार ठेवण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना देण्यात आले आहे. त्यानुसार या वर्षात जुलै अखेरपर्यंत १ लाख ६७ हजार १७२ मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले.ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीमार्फत मंजूर करण्यात आलेली कामे घेण्याचे बंधनकारक आहे. त्यामुळे गावातील कामांची गरज लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येते. जिल्ह्यातील ८७५ ग्रामपंचायतीपैकी सात तालुक्यांमधील ४५२ ग्रामपंचायतीमध्ये ई-मस्टरचा वापर सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे मजुरांना त्यांची मजुरी बँकेमार्फत देण्यात येते. बँक स्तरावरील विलंब टाळण्यासाठी सातही तालुक्यात ईएफएमएस प्रणालीद्वारे मजुरांची रक्कम बँक खाते आधारशी सलग्न करून खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. या योजनेमध्ये पारदर्शकता व मजुरांना विहित मुदतीत त्यांच्या खात्यात मजुरी जमा होत आहे. मजुरांचे आर्थिक शोषण थांबविण्यास यामुळे मदत होत आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेमार्फत रोहयोच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.
वैयक्तिक व सार्वजनिक लाभांच्या ११ कामांना प्राधान्यमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभांची ११ कामे प्राधान्याने राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात सिंचन विहिरी, शेततळे, व्हर्मीकंपोस्टींग, नॅडेप कंपोस्टींग, फळबाग लागवड, निर्मल शौचालय, शोषखड्डे, समृद्ध गावतलाव, जलसंधारण, अंकुर रोप वाटीका, वृक्षलागवड आणि ग्राम सबळीकरणांतर्गत क्रीडांगणे, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभीकरण, ग्रामपंचायत भवन, गावांतर्गत रस्ते, गुरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड आदी कामांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहिरी अधिक लाभदायक ठरणार असल्याने त्यांच्या आर्थिक विकासात नक्कीच भर पडणार आहे. वैयक्तीक लाभाच्या कामासाठी शेतकऱ्यांनी स्वत: मजूर म्हणून काम करणे आवश्यक आहे.