प्रकरण लाखांदूर आयटीआयचे : बयाणात अनेकांचे बिंग फुटलेलाखांदूर : बनावट आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे सन २०१५ चे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर नागपूर सहसंचालक कार्यालयाने चौकशी सुरू केली. त्यानंतर दररोज एक ना अनेक प्रकरण बाहेर निघत आहे. याप्रकरणात अनेक मासे गळाला लागण्याचे संकेत चौकशी समितीने वर्तविले आहे.लाखांदूर आयटीआयमधील ३२ विद्यार्थ्यांचे बनावट प्रवेशाचे प्रकरण तपासात असताना मानव विकास कार्यक्रमातंर्गत सन २००७ पासून प्राध्यापक व कर्मचारी बदलून गेल्यानंतरही किंमती साहित्य गहाळ होणे, प्रभार न दिल्याने कोट्यवधींच्या साहित्यांची चोरी झाल्याचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सांगितले. दि. ९ आॅक्टोबरला नागपूर येथील चौकशी समितीने लाखांदूर आयटीआयला भेट देऊन सन २०१३ पासूनचे आॅनलाईन भरती प्रक्रियेतील संपूर्ण दस्तऐवज, संगणक, हार्डडिस्क, सॉफ्ट व हार्ड कॉपी ताब्यात घेतल्याने मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरवर्षी या आयटीआयमध्ये मानव विकास कार्यक्रमांतर्गत अल्प कालावधीकरिता साहित्य व प्रशिक्षण कालावधीकरिता मानधन दिले जात होते. यात मर्जीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश दर्शवून मानव विकास कार्यक्रमाचा वाट लावण्यात आली. सन २००७ पासून सदर संस्थेतील कार्यरत कर्मचारी, प्राध्यापक यांचे स्थानांतरण झाल्यानंतर त्यांचा प्रभार अद्याप न दिल्याने संस्थेतील महागडे साहित्य गहाळ झाल्याचे तपासात दिसून आले. वारंवार प्रभारी प्राचार्य या महाविद्यालयाला मिळत असल्याने प्राध्यापकांचे प्रशिक्षण संस्थेत कधीही येणे जाणे यामुळे वर्ग वेळेवर भरत नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांकडून रक्कम वसूल करून उत्तीर्ण करण्याची हमी या महाविद्यालयातील प्राध्यापक देत असत. सन २०१३ ते २०१५ पर्यंत आॅनलाईन प्रवेश भरती प्रकरणात अनेक विद्यार्थ्यांकडून आर्थिक रक्कम वसूल करून तेथील प्राध्यापकांनी कमाई केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. या संबंधाने नागपूर सहसंचालक कार्यालयाने काही प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे बयाण नोंदविले आहेत. यात ज्या प्राध्यापकांनी पैशाची मागणी करून बनावट प्रवेश दिला त्या विद्यार्थ्यांनी आपल्या बयाणात पैसे दिल्याचे कबूल केले आहे. नागपूर येथील सहसंचालक कार्यालयाने आता लाखांदूर आयटीआय प्रकरणात सखोल चौकशी सुरु केली. सन २००७ पासूनच्या संपूर्ण प्रकरणाची व आयटीआयमधील आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरु असून यात डझनभर कर्मचारी, प्राध्यापकांवर कारवाईचे संकेत असून निलंबनाची कारवाई होणार म्हणून सहसंचालकांनीच ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
प्रत्येक चौकशीत नवीन प्रकरण बाहेर
By admin | Published: October 14, 2015 12:36 AM