फटका बावनथडी नदीचा : १२५ कुटुंबाचे प्रथम टप्प्यात झाले पुनर्वसन, शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसानरंजित चिंचखेडे चुल्हाडवैनगंगा व बावनथडी नदी खोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना नद्याचे वाढते पात्र आता नुकसानकारक ठरत आहेत. एकट्या बपेरा गावात ८७ हेक्टर शेती नदीपात्रात गिळंकृत झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे.सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे सुपिक खोरे आहे. आंतरराज्यीय सीमेवर असणाऱ्या बपेरा गावाला बावनथडी नदीचे वाढते पात्र कवेत घेण्याच्या तयारीत आहे. नदीच्या वाढत्या पात्राची भीषणता लक्षात घेऊन राज्य शासनाने गावकऱ्यांच्या पुनर्वसनाला हिरवी झेंडी दिली असून १२५ कुटुंबाचे प्रथम टप्प्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. या वसाहतीत नागरी सुविधा पोहोचल्या आहेत. राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यातील १६७ कुटुंबियांच्या पुनर्वसन प्रक्रियेला दगा दिला आहे. याच गावात नाल्यासारखे दिसणारे नदीचे वाढते पात्र गावाच्या दिशेने आहे. या पात्रात गावातील शेतकऱ्यांची बागायती ८७ हेक्टर शेती गिळंकृत झाली आहे. सन १९९४-९५ या वर्षापासून नदीच्या पात्राने भीषणता वाढली आहे. या वाढत्या पात्राची साक्ष देणाऱ्या विहिरी उभ्या आहेत. शासकीय दरानुसार अडीच कोटीचे नुकसान झाले असले तरी मागील २० वर्षातील नुकसान कोट्यवधींची झाले आहे. शासन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही. याशिवाय नदीपात्रात शेती गिळंकृत झाले असल्याने अनेकांचे सधन कुटुंब आता शेतमजूर झाले आहे. भूमिहीन असल्याचा ठपका अनेक शेतकरी कुटुंबावर आल्याने रोजगारासाठी अनेकांनी गावही सोडले आहे. शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत रेती पसरली आहे. या रेतीचा लिलाव करीत महसूल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली नाही. शासनस्तरावर आर्थिक मदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी पाठपुरावा केला आहे. ६३ विहिरी नदीपात्रात गेल्याने या शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड बसला आहे. परंतु शासनस्तरावर या शेतकऱ्यांना विहीर देण्यात आली नाही. दरम्यान वैनगंगा नदी काठावरील माडगी ते बपेरापर्यंत शेतकऱ्यांचे शेतजमिनी नदीपात्रात गिळंकृत झालेल्या गावांमध्ये बोरी, उमरवाडा, कोष्टी, बाम्हणी, रेंगेपार, पांजरा, देवरी (देव), चुल्हाड, बपेरा, सुकळी (नकुल) या गावांचा समावेश आहे. (वार्ताहर)
नदीकाठावरील ८७ हेक्टर जमीन गिळंकृत
By admin | Published: December 23, 2015 12:46 AM