लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाचा तडका बसला आहे. महिनाभरापूर्वी असलेले खाद्यतेलाचे दर चांगलेच भडकले आहेत. महिनाभरापूर्वी ११० प्रतिकिलो दराने विकला जाणारे खाद्यतेल आता १४५ रुपयांवर विकले जात आहे. आणखी दरात वाढ होण्याची शक्यता किरकोळ व ठोक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दिवाळी हा उत्साह व आनंदाचा सण मानला जातो. यानिमित्ताने पाहुण्यांची रेलचेल प्रत्येक घरात दिसून येते. या काळात श्रीमंतासोबत सर्वसामान्यांचा उत्साह शिगेला असतो. परंतु, सणासुदीच्या काळातच खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. परिणामी दसरा-दिवाळीच्या काळात सर्वसामान्य गृहिणीचे बजेट बिघडले आहे.
खाद्यतेलासह कडधान्य, डाळींच्या वाढल्या आहेत. महिनाभरापूर्वी असलेल्या डाळींच्या दरात १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. १६०-१८० रूपये प्रतिकिलो मिळणारी तूरडाळ आता २०० ते २२० रूपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य कुटुंबीयांना बसला आहे. शासनाने यावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
असे आहेत खाद्यतेलाचे दर प्रतिकिलो सोयाबीन तेल प्रतिकिलो ११० वरून १४५ पर्यंत पोचले आहे. शेंगदाण्याचे तेल १७० वरून १८०- १९० रुपये, मोहरी तेल १४० वरून १५० रुपये प्रतिलिटर, किरकोळ दुकानातून ग्राहकांना त्यापेक्षा अधिक दराने खाद्यतेल विकत घ्यावे लागत आहे.
रवा, मैदा व आट्याच्या दरात वाढ सध्या सणामुळे गव्हापासून तयार होणारा रवा, मैदा आणि आट्याच्या दरात किलो मागे ५ ते ५ ते ८ रुपयांची वाढ झाली आहे. आयात मंदावल्याने बाजारभाव वाढल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक वस्तूंचे दर ५ ते १० रूपयांनी वाढले आहेत. मसूर डाळीचा दर प्रतिकिलो ८० ते ११० रुपये झाला आहे.
तर सर्वसामान्यांचे दिवाळे दिवाळीत घराबाहेर राहणारे कुटुंबीय घरी पोहोचतात. फराळाचा आनंद उपभोगतात. महिलांनाही यानिमित्ताने हुरूप येतो. मोठ्या प्रमाणात किराणा व अन्य वस्तूंची खरेदी केली जाते. गोडधोड अधिक प्रमाणात केले जातात. परंतु, यंदा खाद्यतेलासह अन्य वस्तूंच्या किमती वाढल्यास दिवाळीत सर्वसामान्यांचे दिवाळे निघण्याची शक्यता आहे.
"मागील महिन्यात सोयाबीन खाद्यतेल प्रति टिन १७५० रुपयात विकले जात होते. आता ते २१९० विकले जात आहे. दिवाळी सणात आणखी तेलाचे भाव वाढण्याची शक्यता आहे."- किरण भोयर, किराणा व्यापारी.
"महागाईमुळे दिवाळीत लाडक्या बहिणींनी करावे तरी काय, असा प्रश्न आहे. एका बाजूने दिल्याचा दिखावा करायचा, अन् दुसऱ्या बाजूने दुपट्टीने काढायचे, असे शासनाचे धोरण दिसून येत आहे." - मनीषा वनवे, गृहिणी, भंडारा.