राजापूर येथे आंदोलन : सहा शिक्षक देण्याचे आश्वासन लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राजापूर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदे मागील अनेक महिन्यापासून रिक्त आहेत. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता बुधवारी राजापूर येथे शाळा बंद करून आंदोलन केले. तुमसरचे गट शिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट देऊन शिक्षकांची रिक्त पदे दोन दिवसात भरण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले.जिल्हा परिषद शाळेत राजापूर दोन, कवलेवाडा दोन तथा धुटेरा येथे एक शिक्षक देण्याचे आश्वासन गट शिक्षणाधिकारी सी.के. नंदनवार, केंद्र प्रमुख पी.ए. कटनकर यांनी दिले. याप्रकरणी राजापूर येथील सरपंच रितू मासूलकर, उपसरपंच वसंत बिटलाये, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी नाकाडोंगरी केंद्राअंतर्गत शाळेत रिक्त शिक्षकांची पदे भरण्याचे निवेदन शिक्षण विभागाला दिले होते. परंतु दखल घेण्यात आली नाही. त्या अनुषंगाने बुधवारी राजापूर येथे शाळा बंद करून आंदोलन सुरू करण्यात आले. राजापूर येथील आंदोलनात आष्टी, कवलेवाडा व धुटेरा येथील ग्रामस्थ सामील झाले होते.या आंदोलनात दुर्गा अग्रवाल, शिवप्रकाश गौपाले, मोतीराम गौपाले, हितेश नोनारे, मच्छिन्द्र लाऊळे, जिवन शेंडे, उर्मिला लाऊत्रे, सुरेखा गौपाले, सरीता परबते, स्वाती वालदे आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलनस्थळी पंचायत समितीचे उपसभापती शेखर कोतपल्लीवार यांनी भेट दिली. राजापूरचे उपसरपंच वसंत बिटलाये यांनी ग्रामस्थ तथा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.शिक्षण विभाग आंदोलनानंतर शिक्षकांची तात्काळ दखल घेऊन नियुक्ती करण्याचे आश्वासन करीत आहे. शाळा सुरू होण्यापुर्वी तथा आंदोलनाचा इशारा दिल्यावर त्याकडे दुर्लक्ष केले. प्रत्यक्ष आंदोलनाच्या दिवशी शिक्षक नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनानंतर शिक्षण विभाग नरमले
By admin | Published: July 06, 2017 12:35 AM