मोहन भोयरलाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये असा नियम आहे. मात्र तालुक्यातील आदिवासीबहुल धामणेवाडा गावातील ३० आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण एक वर्षापासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. गावात पाचवा वर्ग नाही आणि जंगलव्याप्त गावात वाहतुकीची समस्या असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. असे शिक्षण विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ आहे.धामणेवाडा गाव सातपुडापर्वत रांगांच्या जंगलव्याप्त परिसरात आहे. गावची लोकसंख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना गोबरवाही दहा किलोमीटर तर सिहोरा १४ किलोमीटर अंतरावर शिक्षणासाठी जाण्याची वेळ आली. मात्र घनदाट जंगलाचा परिसर आणि वन्यप्राण्याची भीती यामुळे विद्यार्थी येवढ्या लांब शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे एक वर्षापासून ३० आदिवासी विद्यार्थी शाळेतच गेले नाहीत. गावात पाचवा मर्ग नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात विद्यार्थी येण्याकरीता केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबविते. परंतु ते केवळ कागदोपत्री असल्याचे धामणेवाडा येथील प्रकारावरून तरी दिसते. जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची मागणी आहे.
जंगलव्याप्त गावात बस सुविधाही बंद- धामणेवाडा या आदिवासी गावात वाहतुकीच्या कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. एसटीबस सुविधाही नाही. सध्या तर बसचा संप सुरू आहे. ग्रामीण भागात आजही बस वाहतूक सुरळीत झाली नाही. पालकांची आर्थिक स्थिती बाहेरगावी ठेवण्याची नाही. दहा ते बारा किमी अंतर सायकलेने जायचे म्हटले तरी शक्य नाही. त्यातच वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती कायम असते. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
धामणेवाडा गावात जिल्हा परिषदेने पाचवा वर्ग सुरू केला नाही. एक वर्षापासून येथील शाळा नाही तर आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने येथे तत्काळ पाचवा वर्ग सुरू करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल. -दिलीप सोनवाणे,माजी सरपंच, चिखला