शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून वाहनांची मोठी वर्दळ असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असून परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. लाखनी शहरात उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे शहरातील व परिसरातील महामार्गावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्याचा अंदाज वाहनचालकांना घेता येत नाही व त्यामुळे अपघात होत असतात. सर्व अपघात टाळण्यासाठी गडेगाव महामार्ग पोलीस केंद्रच्या वतीने या महामार्गाची पाहणी करून देखभाल दुरुस्तीसाठी अहवाल सादर करण्यात आला आहे. तसेच महामार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांनी शेतातून निघणारा ट्रॅक्टर सरळ महामार्गावर येतो. त्यामुळे दुचाकी वाहने स्लिप होण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ट्रॅक्टर स्वच्छ केल्याशिवाय महामार्गावर आणू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
कोट
महामार्गावर वाहतुकीच्या दृष्टीने अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित विभागाला लेखी कळविण्यात आले आहे. महामार्गावर अपघात विरहित प्रवास व्हावा, यासाठी गडेगाव महामार्ग पोलीस केंद्र प्रयत्नशील आहे.
- अमित कुमार पांडे, प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस केंद्र, गडेगाव