लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात पुरामुळे १०४ गावांना फटका बसला असून प्रत्येक पूरग्रस्त व्यक्तीला अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. अविलंब मदत देण्यासाठी सरकारला बाध्य करण्यात येईल, असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस बुधवारी जिल्ह्यात आले होते. त्यांनी भंडारा तालुक्यातील दवडीपार, कारधा, यशोदा नगर आणि तुमसर तालुक्यातील उमरवाडा, तामसवाडी गावांची पाहणी केली. तामसवाडी येथे नागरिकांच्या समस्या एकून घेत त्यांना मार्गदर्शन केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात आमचे सरकार होते त्यावेळी संकटकाळी मदत देताना आम्ही कधीही विलंब केला नाही. आता पूरग्रस्तांना शासनाने तातडीने मदत द्यावी, असे ते म्हणाले.
सिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्यापूर्वी नियोजन करणे आवश्यक असून त्याबाबत नागरिकांना जागरूक करण्याची गरज आहे. प्रशासन यात असफल झाल्याचे या महापुरावरून सिद्ध होते. त्यामुळेच शेकडो नागरिक महापुरात उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले. या पुरापासून आपण धडा घेतला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ.परिणय फुके, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार शिशुपाल पटले, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे आदी उपस्थित होते.