शेवई व खजूर पदार्थांची रेलचेल : खाद्यपदार्थ खरेदीसाठी गर्दीदेवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रमजान ईद २६ जून रोजी आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये तयारीची लगबग सुरू झाली आहे. शहरातही ईदचा बाजार सजला आहे. शेवया, घिवर, फेण्या, खजूर आणि तत्सम साहित्याची दुकाने सजली आहेत. मुस्लीम बांधव सहकुटुंब बाजारात जाऊन विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. येथील पोष्ट आॅफिस चौकात करण्यात आलेली रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.रमजान हा महिना पुण्याई आणि भरभराटीचा असतो. रोजा करून अल्लाहाची आराधना केली जाते. या महिन्यात "लैल तुलकद्र" ही सौभाग्याची रात्र येते. रमजानच्या शेवटच्या दहा दिवसात विषम संख्येच्या रात्री २१, २३, २५, २७ व २९ यापैकी एक रात्र असते. या रात्रीची तारीख निश्चितपणे न सांगण्यामागे उद्देश हाच की श्रद्धावंतांनी पाचही रात्री उपासना करावी. या रात्रीत अल्लाहकडून संपूर्ण मानव जातीसाठी दिव्य कुरआनचे अवतरण झाले. त्यामुळे रमजान महिन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या निमित्त शहरासह ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. भंडारा शहरातील पोष्ट आॅफिस चौक परिसरात पवित्र रमजान महिन्यानिमित्त बाजारपेठ सजली आहे. विविध खाद्यपदार्थ आणि साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. येथे रात्री खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. सुखामेवा, फळ, अत्तर, नमाजकरिता लागणाऱ्या टोप्या, फेण्या, कपडे येथे उपलब्ध आहे.
‘ईद’चा बाजार सजला
By admin | Published: June 21, 2017 12:26 AM