भुयार : पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ढोरप क्षेत्रात येणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यामध्ये पडलेल्या चितळाला बाहेर काढून मांस शिजविण्यात आले होते. याप्रकरणी गोपनीय माहितीच्या आधारे वनाधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करीत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनोज राजहंस भिमटे, सूर्यभान ईश्वर ठाकरे, विजय हनुवंत ठाकरे, सुधाकर जानबा चन्नेकार, मुरलीधर ईश्वर ठाकरे, नरेंद्र ऋषी चौधरी, निखिल प्रेमदास जांभुळे, आकाश रामा जांभुळे सर्व राहणार ढोरप (खोकरी) अशी नावे आहेत. विशेष म्हणजे भिमटे याच्या घरी धाड घालून शिजविलेले मांस हस्तगत करण्यात येऊन त्याचवेळी अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्या सहकाऱ्यांना पकडण्यात आले. या सर्वांना पवनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने सर्वांना तीन दिवसांची वनकोठडी ठोठावली होती.
या कारवाईत पवनी वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यासाठी उपवनसंरक्षक एस. बी. भलावी यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांमध्ये सहायक व उपवनसंरक्षक नागुलवार, एम.पी. डहाके, एस.जे. भोयर, आर.बी. धारणे, आर.बी. घुगे, एच. जायभाय, बी.एस. मंजलवाड, एस.पी. घुगे, एस.ए. नरवाडे यांनी या कारवाईत सहभाग नोंदविला होता. आठही जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
अन्यथा कठोर कारवाई
विशेष म्हणजे वनविभागामार्फत आवाहनही करण्यात आले आहे. यात वन्यजीवांना कुठल्याही प्रकारे इजा पोहचविल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.