साखरा येथील घटना : आरोपी फरार दिघोरी : लाखांदूर तालुक्यातील साखरा येथील रहिवाशी जमनाबाई श्रावण शहारे (७०) ही वृद्ध महिला झोपून असताना अज्ञात इसमांनी दगडी वरवंट्याने डोक्यावर वार करून तिचा खून केला. ही घटना मंगळवारला सकाळी उघडकीला आली. पतीच्या मृत्यूनंतर जमनाबाई ही घरी एकटीच राहत होती. तिच्याकडे घर आणि दोन एकर जमीन आहे. ती एकटीच असल्याची संधी साधून अज्ञात आरोपींनी रात्रीच्या सुमारास तिचा खून केला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच साखराचे पोलीस पाटील चुडामण माटे यांनी दिघोरी पोलिसांनी कळविले. त्यानंतर दिघोरीचे ठाणेदार बी.जे. यादव यांनी घटनास्थळाला भेट देऊन खून केलेले दगड ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष कुंभारे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या वृद्धेच्या अंगावर सोन्याची एकदानी होती. ती तशीच होती. त्यामुळे आरोपींनी तिचा खून कशासाठी केला, याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी दिघोरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. तपास ठाणेदार बी.जे. यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रकाश तलमले, हवालदार बांडेबुचे, बर्वे, पुराम व बुरडे करीत आहेत. या महिलेचा खून कुणी आणि कशासाठी केला? याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे. (वार्ताहर)विवाहितेचा गळा आवळून खूनभंडारा : घरगुती कारणाहून एका २५ वर्षीय विवाहितेचा गळा आवळून खून केल्याची घटना भंडारा तालुक्यातील गुंथारा येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. निराशा जगदिश सार्वे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी मुरलीधर भडके यांच्या तक्रारीवरून जगदिश सार्वे याच्याविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के करीत आहेत.
वृद्धेचा खून
By admin | Published: May 27, 2015 12:40 AM