लाखांदूर: जानेवारी महिन्यात तालुक्यातील ११ ग्रा. पं. च्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. सदर निवडणुका पूर्ण होताच तालुक्यातील ६२ ग्रा. पं. च्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार १२ फेब्रु. रोजी तालुक्यातील ५ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचांची निवड करण्यात आली. ५ ग्रा. पं. पैकी ४ ग्रा. पं. मध्ये महिला तर एका ग्रा. पं. मध्ये पुरुष सरपंचाची निवड करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गत १८ जाने. रोजी तालुक्यातील ११ ग्रा. पं. चा निवडणूक जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार गत ५ फेब्रु. रोजी सरपंच आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली होती. सदर आरक्षणानुसार तालुक्यातील ११ नवनिर्वाचित ग्रा.पं.च्या सरपंच, उपसरपंच पदाची दोन टप्प्यात निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यांतर्गत १२ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील पारडी, कोच्छी/दांडेगाव, गुंजेपार/किन्ही, मान्देड/सावरगाव व कन्हाळगाव/चिचगाव आदी ५ ग्रा.पं अंतर्गत सरपंच उपसरपंच पदाची निवड करण्यात आली आहे.
या निवड प्रक्रियेत ५ ग्रा. पं. पैकी ४ ग्रा. पं. मध्ये महिला तर केवळ पारडी ग्रा. पं. मध्ये पुरुष सरपंचाची निवड करण्यात आली आहे. सदर निवड प्रक्रियेनुसार तालुक्यातील मान्देड/सावरगाव ग्रा. पं. मध्ये सरपंच म्हणून सुलभा आशिष बुरडे तर उपसरपंच म्हणून मनोज सीताराम भर्रे, कोच्छी/दांडेगाव येथे सरपंच म्हणून सुरेखा हिरामण देसाई तर उपसरपंच म्हणून मुरली वावरे, गुंजेपार/किन्ही येथे सरपंच म्हणून वर्षा ज्ञानेशर तोंडरे तर उपसरपंच म्हणून मनोहर मारोती कुटे, कन्हाळगाव/चिचगाव येथे कांता विलास तलमले तर उपसरपंच म्हणून नंदू पिलारे व पारडी ग्रा.पं.मध्ये शंकर जिजाराम चव्हारे तर उपसरपंच म्हणून गीता मनोहर शहारे आदींची निवड करण्यात आली आहे. तालुक्यात घेण्यात आलेल्या सरपंच उपसरपंच निवड प्रक्रियेदरम्यान एकाही ग्रा.पं. अंतर्गत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले आहे.