अपघाताची शक्यता : वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष
अडयाळ : येथील ठिकठिकाणचे विद्युत पुरवठा करणारे खांब आता जीर्णावस्थेत आहेत. याकडे दुर्लक्ष म्हणजे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. याकडे तत्काळ लक्ष केंद्रित करून विद्युत विभागाने कारवाई करावी, अशी मागणी अडयाळ ग्रामवासी करताना दिसतात.
अडयाळ गावातील मुख्य चौक असो वा रस्त्याच्या कडेला असलेले विद्युत खांब हा सोसाट्याच्या वाऱ्यात कोसळून तर जाणार नाहीत, अशीही भीती अनेकदा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
वीज वितरण विभागाचे लक्ष जास्तीत जास्त विद्युत ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा करावा यावर आहे. यासोबतच जीर्ण झालेल्या, कधीही कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता असणाऱ्या तसेच एका बाजूला तोल गेलेल्या विद्युत खांबांकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. एखादा अपघात झाल्यास, एखादा जीव गेल्यास याला सर्वस्वी जबाबदार वीज वितरण विभागच राहणार का? असाही संतप्त सवाल व्यक्त होत आहे.
गावात विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे आणि वेळोवेळी तशी कामेसुध्दा केली जातात. पण महत्त्वाचे म्हणजे जे विद्युत पुरवठा करणारी खांब आहेत त्यांची क्षमता आज मात्र ढासळत चालली आहे. आझाद वॉर्डातील बोलके चित्र.
यामुळे या ठिकाणी कधीही धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे गावातील ठिकठिकाणची वास्तव स्थिती आहे. एखादा निष्पाप जीवही जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.