लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : अतिक्रमण धारकांची चुकीची माहिती दिल्याने वरठी येथील २११ अतिक्रमणधारक शासनाच्या योजने पासून वंचित राहीले. ग्राम पंचायतीच्या चुकीच्या निर्णयाचा फटका अतिक्रमणधारकांना बसला. सदर प्रकरण तापले असून वरठी येथील अतिक्रमणधारकांनी एल्गार पुकारला आहे.न्याय मागण्यासाठी जिल्हा परिषद भंडारा गाठून अतिक्रमण धारकांना हक्कापासून वंचित ठेवल्याप्रकरणी दोषी ग्राम पंचायतीवर कारवाई करून पुन: ही योजना सुरु करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाब विचारून तत्काळ प्रकरण मार्गी लावण्यासाठी अतिक्रमण धारक उपस्थित होते. याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याने तूर्तास प्रकरण शांत झाले आहे.२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे ही योजना शासनाने सुरु केली होती. याकरिता गावातील २०११ पूर्वी अतिक्रमण केलेल्या कुटुंबियांना मोफत जागेचे पट्टे व घरकुल योजनेचा लाभ मिळणार होता. २०२२ पर्यंत देशातील कोणतेही कुटुंब घरापासून वंचित राहू नये म्हणून ही योजना सुरु केली होती. गरजू व आर्थिक दुर्बल घटकापर्यत ही योजना सहज पोहचण्यासाठी घरकुल योजनेच्या माध्यमातून काम सुरु होते. पण अनेक कुटुंबाकडे हक्काची जागा नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. यामुळे राज्य सरकारने अतिक्रमण धारकांना या योजनेतून लाभ मिळावा म्हणून सर्वाना जागेचे पट्टे मोफत देण्याचे जाहीर केले.याकरिता शासनस्तरावर २० आॅगस्ट २०१८ रोजी शासन निर्णय काढून स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत माहिती मागवण्यात आली. यात २०११ पूर्वी केलेल्या अतिक्रमण धारकास पट्टे देण्यासाठी माहिती मागवण्यात आली. मात्र वरठी ग्रामपंचायतच्या अफलातून कार्यप्रणालीचा फटका नागरिकांना बसला. अतिक्रमण धारकांसाठी भरून देणाºया परिपत्रकात गावातील सर्व अतिक्रमण २०१८-१९ या काळात दाखवण्यात आले. वास्तविक परिस्थितीत सदर अतिक्रमण २० ते २५ वर्ष जुने आहे. याबाबत ग्रामपंचायतमध्ये सर्व अतिक्रमण धारकाची नोंद असून ते नियमित कर भरतात. शासन अध्यादेश नुसार अतिक्रमण धारकांची माहिती प्रपत्र अ, ब व क प्रमाणे भरून आॅनलाईन करायची होती. त्यानुसार ग्रामपंचायतने कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र ग्रामपंचायतीने कोणतेही अवलोकन न करता सरसकट सर्व अतिक्रमण धारकांना चालू वर्षात अतिक्रमण केल्याचे दाखविले. यामुळे वरठी येथील २११ अतिक्रमणधारक हक्काच्या घरापासून वंचित झाले. या सर्व प्रकरणात दोषींवर कारवाई करून पुन: ही प्रक्रिया सुरु करण्याची मागणी अतिक्रमण धारकांनी केली. गुरुवारी शेकडो अतिक्रमण धारकांनी भंडारा गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समक्ष आपल्या व्यथा मांडल्या. यावर तात्कळ निर्णय घेत खंडविकास अधिकारी मोहाडी व ग्राम विकास अधिकारी वरठी यांच्याशी भ्रमणध्वनीवर सूचना दिल्या आहेत. याबाबत चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी रवी येळणे, दिलीप उके, उपसभापती उमेश पाटील, रोशन भुरे, पुष्पा भुरे, बाल्या पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप बोन्द्रे, सचिन वाघमारे, विद्या भिवगडे, घनश्याम बोन्द्रे, शुभांगी येळणे व जिल्हा परिषद सदस्य रामराव कारेमोरे उपस्थित होते.प्रकरण तपासून अहवाल सादर करणारअतिक्रमण धारकांना शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याचे प्रकरण हे माझ्या कार्यकाळातील नाही. यामुळे सदर तक्रारीनुसार योग्य तपासणी करून पुढील कारवाई करणार आहे. अतिक्रमण धारकांना मोफत पट्टे देण्याची योजना होती. याबाबत ग्राम पंचायत कार्यालयाने चुकीचे माहिती पुरवल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी याना करण्यात आली. यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रकरण रितसर तपासून माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्राम पंचायत स्तरावर तक्रारीनुसार तपासणी सुरु असून सदर आॅनलाईन प्रक्रिया सुरु करण्याची मागणी करण्यात आली. आहे. प्रक्रिया सुरु झाल्यास पुन: नोंदणी करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी दिगांबर गभणे यांनी दिली.ही चूक गंभीरच -चरण वाघमारेशासनाच्या योजनेपासून लाभार्थ्यांना वंचित ठेवणे ही गंभीर बाब आहे. वरठी येथील अतिक्रमण धारकांना शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेपासून हेतुपरस्पर वंचित ठेवण्यात आले. याबाबत ग्राम विकासमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. नागरिकांना हक्कापासून वंचित ठेवणे कधीही खपवून घेतले जाणार नाही. विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देणे व त्यांच्या हक्कासाठी पुढाकार घेणे माझे कर्तव्य असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली. ग्राम ग्रामपंचायतीच्या चुकीचा फटका नागरिकांना बसणार नाही. लवकरच यावर तोडगा काढणार असून दोषींवर कारवाई होणार आहे, असे आश्वासन त्यांनी उपस्थित अतिक्रमण धारकांना दिले.
अतिक्रमणधारकांचा जागेच्या पट्ट्यासाठी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:11 PM
अतिक्रमण धारकांची चुकीची माहिती दिल्याने वरठी येथील २११ अतिक्रमणधारक शासनाच्या योजने पासून वंचित राहीले. ग्राम पंचायतीच्या चुकीच्या निर्णयाचा फटका अतिक्रमणधारकांना बसला. सदर प्रकरण तापले असून वरठी येथील अतिक्रमणधारकांनी एल्गार पुकारला आहे.
ठळक मुद्देग्रामपंचायतीने दिली चुकीची माहिती : शेकडो अतिक्रमणधारकांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव