मोहाडी (भंडारा) : एवढी वर्षे ज्या भाजपाच्या विरोधात लढलो, जनतेपर्यंत जाऊन राष्ट्रवादी पक्ष वाढविला आणि ग्रामीण भागात मजबूत केला. उद्या त्याच भाजपासोबत बसून काम करणे मनाला न रुचणारे आहे. जनतेचे प्रश्न घेऊन लढलो. त्या जनतेच्या विश्वासाला तडा जायला नको, ही आमची भावना आहे. पक्षीय संघटनात्मक दृष्टीने विचार करता यापुढे शरद पवार यांच्यासोबतच राहून काम करणे योग्य असल्याने शरद पवार यांच्या पाठीशी राहणार असल्याचा निर्धार मोहाडी येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त झाला.
जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षात फुटीची पहिली ठिणगी बुधवारी मोहाडी तालुक्यात पडली. राष्ट्रवादी पक्षातील दुसरा गट आपली भूमिका जाहीर करीत शरद पवार यांच्यासोबत गेला आहे. याबाबत मोहाडी येथील विश्रामगृहात सभा झाली. या सभेला माजी तालुकाध्यक्ष वासुदेव बांते, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी, अनिल काळे, माजी पंचायत समिती सदस्य केशव बांते, भगवान सिंगनजुडे, माजी युवक तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्याम कांबळे, आंधळगाव जिल्हा परिषद सर्कल प्रमुख प्रदीप बुराडे, माजी जिल्हा युवक कॉंग्रेस सचिव शकील आंबागडे, ईश्वर माटे, गुड्डू बांते, देवानंद चौधरी, विजय बारई आदी ६१ कार्यकर्ते उपस्थित होते.
या सभेत किरण अतकरी, वासुदेव बांते,अनिल काळे, केशव बांते आदींनी संबोधित केले. या नंतर किरण अतकरी, वासुदेव बांते यांनी प्रसारमाध्यमांपुढे आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपासोबत केलेली हातमिळवणी आम्हाला पटणारी नाही. म्हणून आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी आहोत. मोहाडी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद सदस्य सोबत असल्याचा दावा त्यांनी केला.
पटेल आमचे नेते कालही आणि आजही
खासदार प्रफुल्ल पटेल हे आमचे कालही नेते होते, आजही आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आम्ही काम केले. भाजपाविरोधात लढलो. मात्र पक्ष संघटनात्मक विचार करता स्थानिक नेते आमच्या म्हणण्याकडे जराही लक्ष देत नाहीत. यामुळे मूळ पक्षात शरद पवार यांच्यासोबतच राहावे लागेल, असे यावेळी वासुदेव बांते यांनी सांगितले.
शरद पवार समर्थकांची भंडाऱ्यात सभा
या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शरद पवार समर्थकांची आणि कार्यकर्त्यांची सभा गुरुवारी भंडारा सभा विश्रामगृहात बोलावली आहे. या बैठकीत भूमिका मांडली जाणार आहे. येत्या चार दिवसांनंतर काय निर्णय होतो यावर आम्ही आपली पुढची भूमिका ठरवू असे वासुदेव बांते व किरण अतकरी यांनी सांगितले.