जनआंदोलन समितीचा पुढाकार : मोर्चाचे सभेत रुपांतर भंडारा : भंडारा जिल्हा दारुमुक्त करण्यात यावा या मुख्य मागणीला घेवून आज सोमवारी भंडारा जिल्हा दारुमुक्त, व्यसनमुक्त जनआंदोलन समितीच्या वतीने शास्त्री चौकातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा त्रिमुर्ती चौकात आल्यावर याचे रुपांतर सभेत झाले. याचवेळी पदाधिका-यांनी दारुबंदीसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला. आंदोलनाचे उपोषण समितीचे जिल्हाध्यक्ष सचीन हिंगे, तुलसीराम गेडाम, विस्तारी कुर्झेकर, ज्योत्सना गजभिये, सुनिता हिंगे यांच्यासह अन्य करीत आहेत. या आशयाचे निवेदनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिका-यांना मार्फत पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात दारुबंदी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही समितीने दिला होता. परंतु या अनुषंगाने शासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. परिणामी जनआंदोलन समितीच्या पुढाकाराने २३ जानेवारी रोजी मोर्चा काढून आमरण उपोषण करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला होता. शास्त्री चौकातून निघालेला मोर्चा त्रिमुर्ती चौकात पोहचताच त्याचे रुपांतर सभेत झाले. यावेळी समितीच्या पदाधिका-यांसह भाकपचे माजी नगरसेवक हिवराज उके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. याचवेळी सचीन हिंगे, तुलसीराम गेडाम, अचल मेश्राम, विस्तारी कुर्झेकर, ज्योत्सना गजभिये, देवा वाघमारे, भुषण माटे यासह अन्य जणांनी उद्बोधनात्मक भाषण दिले. दारुमुळे शेकडो आयुष्य उध्दवस्त होत असताना शासन व प्रशासन दारुबंदी सारख्या गंभीर विषयावर विचार करीत नाही, ही खरीच चिंतनीय बाब आहे. दारुबंदी झाल्याशिवाय समिती स्वस्थ बसणार नाही असा खणखणीत इशाराही यावेळी देण्यात आला. त्रिमुर्ती चौकात यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. उपोषण मंडपात यावेळी मंदाबाई गभणे, राजन मेश्राम, देवाजी वाघमारे, शुभांगी चांदेवार, वंदना बडोले, श्रीराम बोरकर, सुशिला नागलवाडे, मिराबाई बागडे, सैय्यद जाफरी, हरिदास रामटेके, हरिशचंद्र रामटेके, जयपाल गडपायले, लिलाधर बेगड यांच्यासह अन्य उपोषणकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दारुमुक्तीसाठी आमरण उपोषण
By admin | Published: January 24, 2017 12:29 AM