राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविली जाते. ही मोहीम आता लोकचळवळ बनली आहे. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यात येत आहेत. त्यामुळे आता शासनाने ग्रामीण भागातील स्त्री अत्याचाराच्या घटनेचा चढता आलेख पाहता, त्यावर तात्काळ आळा बसण्यासाठी तंटामुक्त गाव मोहिमेचा आधार घेण्याचे निश्चित केले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत महिला सुरक्षा व महिलांसंबंधी असलेल्या प्रकरणात अधिक दक्ष राहण्यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महिलांसंबंधी आलेल्या सर्व प्रकरणात मार्गदर्शन व त्यासंबंधी परिणामकारक अंमलबजावणी होण्यासंबंधी राज्यातील सर्व तंटामुक्त गाव समित्यांना गृह विभागाच्या वतीने सूचित केले आहे. मोहिमेच्या दहा वर्षात गाव समित्यांनी गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटविण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे संबंधित गावातील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण घटले असून, न्यायव्यवस्थेवरचा ताणही कमी होण्यास मदत झाली आहे. मागील दहा वर्षांच्या काळात राज्यातील हजारो गावांनी तंटामुक्त होत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे पटकाविली आहेत. त्यातून गाव विकासाला चालना मिळाली आहे.
आता महिलांना तंटामुक्त गाव समितीत ५० टक्के इतका समान वाटा अनिवार्य करण्यात आल्याने, महिलांविषयक समस्या झपाट्याने सुटण्यास मदत होणार आहे. मात्र अद्यापही काही गावांमध्ये महिला सदस्यांना कागदोपत्री सामावून घेत प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे.