युवराज गोमासे।आॅनलाईन लोकमतकरडी (पालोरा) : पालोरा व ढोरवाडा गावातील सात गुळधाणीमुळे स्थानिक ३०० लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात सुरु झालेल्या या गुळघाणीवर ४० ते ४५ मजुरांना दैनंदिन रोजगार मिळाला आहे. स्थानिकांसह उत्तर भारतीय कारागिरांनाही दिवसाला २०० ते ३०० रुपये रोज मिळून पाच महिने काम मिळत असल्याने समाधान व्यक्त करीत होत आहेत. स्थानिक तरुणांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहेत.ढोरवाडा हे वैनगंगा नदीकाठावर वसलेले बाराशे लोकसंख्येचे छोटेसे खेडेगाव आहे. मागील १० वर्षांपासून येथे गुळघाणीचा व्यवसाय केला जात आहे. गावात शेतकºयांची संख्या अधिक असून शेती व पशुपालन हा त्यांचा मुळ व्यवसाय आहे. गावात अगोदर सर्वाधिक धानाचे पीक घेतले जायचे. विहिरींना भरपूर पााणी व सिंचनासाठी विहिरींची सोयी उपलब्ध झाल्याने शेतकºयांनी धानाबरोबर ऊस पिकांकडे मोर्चा वळविला.गावात सध्या जवळपास २५० एकर शेतीमध्ये ऊसाचे नगदी पीक घेतले जाते. अगोदर संपूर्ण ऊस वैनगंगा सहकारी साखर कारखान्यात विकला जायचा. मात्र, मध्यंतरी कारखाना बंद पडल्याने ऊसाचे करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्याने गावातील तरुण शेतकऱ्यांनी गुळ घाणीच्या स्वत:च्या व्यवसायाला सुरुवात केली. आज गावात सात गुळघाणी आहेत. गुळघाणी चालविणाऱ्या तरुणांमध्ये नवनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर भोयर, माजी सरपंच शिवशंकर बोंदरे, श्रीधर बोंदरे, शेरू भोयर, सुखराम निंबार्ते, बाळकृष्ण बुद्धे आदींचा समावेश आहे. शेतकºयांना प्रती टन ऊसासाठी २२०० रूपये भाव दिला जात आहे.कोरडवाहू पट्ट्यातील पालोरा गावातही प्रकाश खुणे या तरुणाने मागील दोन वर्षांपासून गुळ तयार करण्याच्या उद्योगाला सुरुवात केली आहे. प्रत्येक गुळ घाणीवर ऊसतोड, वाहतूक, घाणी व गुळाला तुमसर बाजार समितीपर्यंत पोहचविण्यासाठी सुमारे ४५ मजुरांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. गुळ घाणीवर काम करणाºया कुशल मजुरांमध्ये उत्तर प्रदेशातील बदाई जिल्ह्यातील दातारगंज तालुक्यातील मजुरांचा समावेश आहे.धानाची शेती परवडणारी नाही. स्वत:चा रोजागर करून स्वत:च्या शेतीबरोबर इतरांच्या ऊसाच्या पिकांची विल्हेवाट लावावी, गावातील मजुरांना रोजगार देण्याच्या उद्देशाने हा गुळ घाणीचा व्यवसाय गावातील तरुणांनी सुरु केला आहे. आज गावात ६ गुळ घाणी कार्यरत असून पिकाला चांगला भाव मिळत आहे.-ज्ञानेश्वर भोयर, सरपंच तथा गुळघाणी संचालक, ढोरवाडा.
सात गुळघाणीतून ३०० लोकांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:14 PM
पालोरा व ढोरवाडा गावातील सात गुळधाणीमुळे स्थानिक ३०० लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : स्वयंरोजगारासाठी सरसावले ढोरवाडा व पालोराचे ग्रामस्थ