पालांदूर : एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ! या ऊक्तीने प्रभावित असलेल्या पालांदूर येथील आमची माती आमची माणसं या सोशल मीडिया ग्रुपच्या सदस्यांनी गावातीलच एका तरुणाला चहाची टपरी अर्थात पान पॅलेस लावण्याकरिता आर्थिक सहकार्य करीत समाजात नवा आदर्श पेरला आहे.
बेरोजगारी दररोज वाढत आहे. शासन रोजगार देण्याकरिता कमी पडत आहे. कोरोनाच्या संकटाने सगळ्यांची अर्थव्यवस्था बिकट झालेली आहे. अशाही परिस्थितीत एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका अत्यंत स्तुत्य आहे. आमची माती आमची माणसं या ग्रुपच्या सदस्यांनी हितेश पडोळे या तरुणाला आर्थिक सहकार्य करीत सामाजिक जाणिवेला सहकार्य केले.
स्मार्टफोनच्या माध्यमातून सोशल मीडियावर बरेच ग्रुप कार्यान्वित आहेत. यात फार मोजकेच सोशल मीडिया ग्रुप सामाजिक उपक्रम राबवून एकमेकांना हातभार लावतात. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक यासारख्या विविध क्षेत्रात प्रबोधनसुद्धा करतात. परंतु स्वखर्चातून एखाद्याला रोजगार देण्याचा स्तुत्य उपक्रम क्वचितच ठरतो. पालांदूर येथील आमची माती आमची माणसं या ग्रुपच्या सदस्यांनी निभावलेली सामाजिक एकता निश्चितच प्रेरणादायी ठरली.
दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रुपचे प्रमुख भास्कर पिंपळे, ज्येष्ठ नेते तु. रा .भुसारी, जिल्हा परिषद माजी सदस्य भरत खंडाईत, प्रा. आनंदराव मदनकर, सुनील उरकुडे, माजी उपसरपंच मोरेश्वर खंडाईत, मनोहर सेलोकर, नितीन रणदिवे, ज्येष्ठ नागरिक केशव कुंभरे, गुणवंत दिघोरे आदी उपस्थित होते.