लाखनी तालुक्यातील पालांदूर शेजारील वाकल येथे मग्रारोहयो योजने अंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम नियोजित आहे. परंतु कोरोनाचे संकट असल्याने तपासणी आवश्यक आहे.
सरपंच टिकाराम तरारे यांनी गावात आरोग्य विभागाच्या व पंचायत समिती लाखनी यांच्या सहयोगाने ग्रामपंचायत कार्यालयात दोन दिवसांचे आरोग्य शिबिर सुरू केले आहे.
यात पहिल्या दिवशीच ९० लोकांच्या आरटीपीसीआर तपासणी व काही मजुरांची लसीकरण मोहीम पार पडली. गुरुवारला आणखी तपासणी व लसीकरण सुरू केले आहे. यात गावातील मजुरांनी सुद्धा हिरीरीने सहभाग नोंदविला आहे हे विशेष !
शिबिराला खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, तालुका समन्वयक नरेश नवखरे, सरपंच टिकाराम तरारे, यशवंत सपाटे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, आरोग्य विभागाचे डॉक्टर अमित जवंजार व त्यांची संपूर्ण टीम मजुरांच्या सेवेत तत्पर होते.
कोरोना शिबिर सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत चालले. कर्तव्यतत्पर जबाबदार नागरिकांनी आपापली जबाबदारी सांभाळत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करावे. काही समस्या उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाची संपर्क करण्याचे आवाहन सरपंच टिकाराम तरार यांनी यावेळी केले.