आॅनलाईन लोकमतलाखांदूर : तालुक्यातील पिंपळगाव (को) येथील मोठया तलावातील (गट क्रमांक ३०५) जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण सुरू असताना ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी हे काम रोखले. त्यानंतर लघुपाटबंधारे विभागाला माहिती देताच उपविभागीय अभियंता व त्यांच्या चमूने भेट देऊन पाहणी केली.सदर लघु पाटबंधारे विभागाच्या २५ एकर जागेवर अतिक्रमण करणाऱ्या हरी शेंडे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव (को) येथील गट क्रमांक ३०५ आराजी ८९.९२ हेक्टर जागा मालगुजारी तलावात मोडते.यातील ४० एकर जागेत विस्तीर्ण तलाव असून या तलावात पाणी असून येथूनच लाखांदुरला पाणीपुरवठा केला जातो. याच तलावातील जागेमध्ये हरी शेंडे यांनी मागील तीन दिवसांपासून तलावाच्या जागेत शेती कसण्यासाठी ट्रॅक्टरने मशागतीला प्रारंभ केला होता.दरम्यान, याची ही माहिती शुक्रवारला सकाळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कळली. त्यानंतर सकाळी ११ वाजतापासून शेकडो लोकांनी तलावाकडे कूच केली. अधिकारी येईपर्यंत व अतिक्रमण करणाऱ्या हरी शेंडे याच्याविरूद्ध पोलीस कारवाई होईपर्यंत घटनास्थळावरून हटणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.त्यामुळे भंडारा लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पी.ए. पुनवतकर, पठाण, सचिन राठोड, गजापुरे, डोये, ठेंगरे, वनक्षेत्राधिकारी रमेश दोनोडे, सहायक क्षेत्राधिकारी पंचभाई , वनपाल मंजेलवर, सरपंच शालू गहाने, उपसरपंच गोपाल परशुरामकर, वनहक्क समितीचे सचिव लक्ष्मण पुष्तोडे, ग्रामपंचायत सदस्य हिरा गजभिये, भिवराज परशुरामकर, देवराम परशुरामकर, गोवर्धन गहाने, प्रशांत मेश्राम, यादव परशुरामकर, फुलबांधे, तलाठी गवाणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.यावेळी तलावात अतिक्रमण करणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याची एकमुखी मागणी नागरिकांनी केली. यावेळी घटनास्थळी उभे असलेल्या झाडांची साल काढून ही झाडे वाळविण्याचा प्रकार केल्याचे उघडकिला आले.शेकडो झाडे कापून विकण्याचा गोरखधंदा हरी शेंडे याने केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. यावेळी उपविभागीय अभियंत्यांनी हा विषय कार्यकारी अभियंता यांच्याकडे मांडणार असल्याचे सांगून त्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.मागील अनेक वर्षांपासून या तलावातील जागेवर अतिक्रमण होत आहे. ही बाब गंभीर असून ग्रामपंचायतच्या तक्रारीच्या आधारे कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शन मागवून संपूर्ण जुने व नवीन अतिक्रमण काढणार आहे.- पी.ए. पुनवतकर, उपविभागीय अभियंता, लघु पाटबंधारे लाखांदूर.पिंपळगाव येथील तलाव हे पाणीपुरवठा योजना व मासेमारीकरीता वरदान आहे. मागील दहा वर्षात तीन एकरावर अतिक्रमण केल्यानंतर आता चक्क २५ एकरावर अतिक्रमण करून तलावाचे अस्तित्व नष्ट करण्याचा डाव आहे. संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींना तक्रार करून तलावातील अतिक्रमण काढणार आहे.- शालू गहाणे, सरपंच, पिंपळगाव (को.) ता.लाखांदूर.
तलावाच्या २५ एकर जमिनीवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 10:47 PM
तालुक्यातील पिंपळगाव (को) येथील मोठया तलावातील (गट क्रमांक ३०५) जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण सुरू असताना ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी हे काम रोखले.
ठळक मुद्देपिंपळगाव येथील प्रकार : अतिक्रमण करणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले