मोहाडी तालुक्यातील रोहा येथील जिल्हा परिषदचा तलाव क्रमांक १, गट क्र. १५०५,आराजी १०.७० आर. रोहा येथील बहुउद्देशीय वैनगंगा मत्स्यपालन सहकारी संस्थेला मत्स्यपालनाकरिता लीजवर देण्यात आला आहे. संस्थेने संपूर्ण तलावाच्या जागेची लीज जिल्हा परिषदेच्या खजिन्यात जमा केली आहे. परंतु तेवढी जागा शिल्लकच नसून अनेकांनी या तलावाच्या जागेवर अतिक्रमण करून शेती तयार केली आहे. आता पुन्हा बाहेरच्या एका व्यक्तीने तलावाच्या अनेक एकर जागेवर अतिक्रमण करून तेथे असलेले मोठमोठे झाडे जेसीबीने तोडून शेती तयार करीत आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात येत आहे, ती जागा मत्स्यपालन संस्थेने बोडी तयार करून मत्स्यबीज तयार करण्यासाठी राखीव ठेवली होती.
परंतु सदर जागेची लीज भरून सुद्धा अतिक्रमण करण्यात आल्याने बीजोत्पादन करण्याची समस्या निर्माण झाली आहे. वर्षाचे प्रति हेक्टरी १५०० कि. ग्रा. मत्स्य उत्पादन गृहीत धरले तर अतिक्रमण झालेल्या ४ हेक्टर्सचे ६ हजार कि.ग्रा. उत्पादन कमी झाल्याने वर्ष १९९० ते २०२१पर्यंत तीस वर्षांत १८० टन घट झाली असून, त्याची किंमत १२ कोटी सहा लाख रुपये संस्थेचे नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न करण्यात आला असून, जर प्रशासनाने तलावात झालेले अतिक्रमण काढले नाही तर आम्ही स्वतःच्या पैशाने हे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवू व त्यानंतर लीजचे पैसे सुद्धा भरणार नाही व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याला प्रशासनच जबाबदार राहील, तत्पूर्वी जिल्हा परिषदेला घेराव घालून ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आयोजित पत्र परिषदेत देण्यात आला. पत्र परिषदेला मत्स्य व्यवसाय संघ भंडाराचे संचालक संजय केवट, क्रांती ढिवर सेना अध्यक्ष अनिल मांढरे, मत्स्यपालन संस्था डोंगरगावचे अध्यक्ष मोहन खेडकर, मत्स्यपालन संस्था रोहाचे अध्यक्ष हरिशचंद्र बर्वे, सचिव इस्तारी बर्वे, राजू बर्वे, कुशन बर्वे, शंकर बर्वे, भीमराव शेंडे, मुलचंद रहेकवार, रामू बर्वे, रजनू बार बरय्या, सुनील बर्वे, विजय बर्वे इत्यादी उपस्थित होते.