भंडारा पंचायत समितीची अंमलबजावणी : ७ हजार ४८४ नवीन शौचालयाची केली बांधणीभंडारा : गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वत्र स्वच्छ भारत अभियान उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात भंडारा पंचायत समितीने सक्रीय सहभाग नोंदविला. मार्च या वित्तीय वर्षाच्या अखेरीस पंचायत समितीने त्यांना दिलेल्या शौचालय निर्मितीच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यात आली. यावर्षात पंचायत समितीने ७ हजार ४८४ नवीन शौचालयाचे बांधकाम करून तालुक्याला ओडीएफ नुसार हागणदारीमुक्त केले. भंडारा पंचायत समितीला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुका हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्या अनुषंगाने तालुक्याला पहिल्या वर्षी दिलेली उद्दिष्टपूर्ती करता आलेली नाही. त्यानंतर पुढील वर्षी पंचायत समितीने सक्रीय सहभाग नोंदवित ओडीएफ करण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. यावर्षी २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार भंडारा पंचायत समिती सन २०१६-१७ या वित्तीय वर्षासाठी ७ हजार ४८४ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट त्यांनी लीलया पार केले.भंडारा पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी मंजुषा ठवकर यांच्या कुशल नेतृत्वात हा तालुका हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. पंचायत समितीने पायाभूत सर्व्हेक्षणानुसार वैयक्तिक शौचालयाने उद्दिष्टपूर्ती वेळेत पूर्ण करून ग्रामपंचायत व तालुका हागणदारीमुक्त केल्याबद्दल या सर्व स्वच्छता मिशन सैनिकांचा सत्कार करण्यात आला. एका छोट्याखानी कार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खंडविकास अधिकारी मंजुषा ठवकर, सहाय्यक खंडविकास अधिकारी तामगाडगे, विस्तार अधिकारी बोदेले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डी.एस. बिसेन, अभियांत्रिकी तज्ज्ञ दिपक बोडखे, माहिती शिक्षक संवाद सल्लागार राजेश येरणे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, गटसमन्वयक नागसेन मेश्राम, समूह समन्वयक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व पंचायत समिती कर्मचारी व यावेळी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
‘ओडीएफ’ उद्दिष्टपूर्तीने वित्तीय वर्षाचा शेवट
By admin | Published: April 10, 2017 12:35 AM