साकोली येथील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सिंचन विहीर बांधकामाअंतर्गत एम.बी. बुक तयार करण्याकरिता मागणी केलेल्या सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील लघु सिंचन उपविभागातील कंत्राटी गृहनिर्माण अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले. मोहनीश रायभान सोनवाने (२५) असे या अभियंत्याचे नाव आहे. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी केली. तक्रारदार व त्याचा मित्र यांना शासनाच्या धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत दोन विहीर बांधकामअंतर्गत मंजूर करण्यात आल्या. सदर दोन्ही विहिरीचे बिल प्रलंबित होते. प्रलंबित बिलाची एम.बी. बुक तयार करण्याकरिता अभियंता सोनवाने यांनी दोघांकडून दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय बिल निघणार नाही असेही मोहनीशने सांगितले. लाच देण्याची इच्छा नसल्याने याची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. दरम्यान मंगळवारी सापळा रचून तडजोडीनंतर मोहनीश सोनवाने याला एकूण सात हजार रुपयाच्या लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी एसीबीने साकोली पोलीस ठाण्यात सोनवानेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. सदर कारवाई पोलीस उपायुक्त पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, श्रीकांत हत्तीमारे, शेखर देशकर, कोमलचंद बनकर, अमोल खराबे यांनी फत्ते केली.
सात हजारांची लाच घेताना अभियंता गजाआड
By admin | Published: July 12, 2017 12:20 AM