गोंदिया : वीज अभियंत्यांच्या मागण्यांना घेऊन बुधवारी (दि. २५) मुंबई येथे संघटनेचे पदाधिकारी व कंपनी संचालकांत झालेल्या बैठकीत काहीच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, वीज वितरणच्या अभियंत्यांनी गुरुवारी (दि.२६) येथील वीज कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सायंकाळी ६ वाजता गेट मीटिंग घेऊन आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर, आता वीज अभियंत्यांचे ६ सप्टेंबरपासूनचे आंदोलन कायम राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आपल्या जिवाची बाजी लावून वीज अभियंता काम करीत आहेत. असे असतानाही महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनी प्रशासनाकडून त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच आता स्टाफ सेटअप धोरणाच्या आड अभियंत्यांची ५०० हून अधिक पदे रिक्त ठेवण्याचा डाव साधला जात आहे. यामुळे वीज अभियंत्यांवर नोकरी जाण्याची पाळी आली असून, त्यांच्यात चांगलाच रोष व्याप्त आहे. दरम्यान, वीज अभियंत्यांच्या मागण्यांना घेऊन सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे पदाधिकारी व कंपनी संचालकांत बुधवारी (दि.२५) मुंबई येथे बैठक झाली. मात्र, बैठकीत संचालकांनी कोणत्याही प्रकारचे ठोस व लेखी स्वरूपात उत्तर दिले नाही. यामुळे ही चर्चा फिस्टकल्याने वीज अभियंत्यांनी गुरुवारी (दि.२६) कार्यालयाच्या प्रवेशद्वारात घेतलेल्या गेट मीटिंगमध्ये कंपनी प्रशासनाविरोधात निदर्शने करून रोष व्यक्त केला. याप्रसंगी असोसिएशनचे सचिव खुशाल सोनी, प्रविभागीय सचिव प्रदीप मोहीतकर, आनंद जैन, अजित जीचकर, रितेश टांगले, विनोद मस्करे, विलास कोडेकर, प्रदीप राऊत उपस्थित होते.