साकोली (भंडारा) : तालुक्यातील सिरेगावटोला येथील एक आदिवासी कुटुंब आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह मागील १७ दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना घडली आहे. यामध्ये अशोक पंधरे, त्याची पत्नी व दोन मुले यांचा समावेश असल्याचे साकोली येथील सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह येथे पार पडलेल्या पत्रपरिषदेत सांगण्यात आले.
अशोक पंधरे यांचे काका जयपाल पंधरे पत्रपरिषदेत म्हणाले, बेपत्ता कुटुंबाविषयी ११ मार्चला सानगडी येथील एका इंटरनेट कॅफेमधून पोलिसांत ऑनलाइन तक्रार करण्यात आली. एवढी गंभीर घटना घडल्याचे कळवूनही पोलिसांनी १५ मार्चपर्यंत गंभीर्याने घेतले नाही, असा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. दरम्यान, जयपाल पंधरे यांनी अखिल भारतीय आदिवासी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी यांना घटनेविषयी माहिती दिली. त्यांनी पुढाकार घेऊन पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, त्यानंतरही दोन-तीन दिवस वाट बघा नंतर पुढील कार्यवाही करू, असे पोलिसांकडून सांगण्यात आल्याची माहिती यावेळी कुटुंबीयांनी दिली.
पत्रपरिषदेत आदिवासी समाजाचे नेते बिसन सय्याम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी, बिरसा फायटर्सचे उपाध्यक्ष प्रमोद वरठे, नॅशनल पीपल्स फेडरेशनचे अध्यक्ष धर्मराज भलावी, सुरेश पंधरे आदी उपस्थित होते.
दिला होता कुटुंबीयांसह आत्मदहनाचा इशारा
शालू अशोक पंधरे (रा. सिरेगावटोला) यांची वडिलोपार्जित शेती सावरबंध येथील भूखंड क्र. ४५५ मध्ये आहे. या शेतीच्या काही भागावर विलास बडवाईक (सावरबंध) यांनी अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले. याबाबत साकोली पोलिसांत तक्रार नोंद असून, पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती कायदानुसार गुन्हा दाखल केला आहे. या जागेत पंधरे यांनी धान रोवणी केली होती; परंतु बडवाईक यांनी रात्रीच धान कापून चोरून नेल्याची पंधरे यांची तक्रार आहे. पोलिसांत तक्रार करूनही बडवाईक यांनी जागेवरील ताबा सोडला नाही. त्यामुळे शालू पंधरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे १३ मार्चला कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याचे निवेदन दिले होते. परंतु, त्यापूर्वीच पंधरे कुटुंब बेपत्ता झाले.
न्याय न मिळाल्यास आंदोलन
या प्रकरणात भूमिअभिलेख व महसूल विभागाने सहकार्य न केल्याने पंधरे कुटुंब मानसिक तणावात होते, असा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपास करून दोषींना अटक करावी व पंधरे कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा आदिवासी समाजाकडून आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.