धान विक्रीकरिता सातबारा असणे अत्यंत आवश्यक असून त्याकरिता ऑनलाइन नोंदणी करावी लागते. धानाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना तलाठ्याकडून सातबारा घ्यावा लागतो. यामुळे खऱ्या शेतकऱ्यांचा धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री व्हावा हा शासनाचा उद्देश होता; परंतु येथे या नियमांनाच फाटा देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी रबी धानाची लागवड केली नाही अशा शेतकऱ्यांकडून सातबारा घेण्यात येत आहेत. संबंधित शेतकरी तलाठ्याकडून रबीची धानाची लागवड केल्याचा सातबारा घेतो. त्यानंतर धान विक्री करणारे हा सातबारा त्या धानाला लावतो; परंतु प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांनी रबीची धानाची लागवड केलीच नाही. तरीसुद्धा त्यांना सातबारा प्राप्त झाला आहे. त्यामुळे येथे धान विक्रीचे गौडबंगाल सुरू असल्याची माहिती आहे.
बाजार समितीतून कमी किमतीचे धान घेणारी टोळी सक्रिय झाली आहे. ही टोळी ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे, त्यांचे सातबारा जमा करते. सदर धानाला ते सातबारा जोडले जातात; परंतु प्रत्यक्षात या शेतकऱ्यांनी रबीत धानाची लागवड केलीच नाही. अशा शेतकऱ्यांचेही सातबारे जोडले जात असल्याचा प्रकार तुमसर तालुक्यात सुरू आहेे. त्यामुळे आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर खऱ्या शेतकऱ्यांचे धान पडून आहेत. तर सातबारात हेराफेरी करणाऱ्यांचे धान विक्री केली जात आहेत. या सर्व प्रकरणात तलाठी जबाबदार आहेत. तलाठ्याने सातबारा देताना संबंधित शेतकऱ्यांनी खरोखरच रबी हंगामात धानाची लागवड केली काय, हे पाहणे अत्यंत आवश्यक असताना तसे पाहिले जात नाही, हे वास्तव आहे.
बॉक्स
वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष
तलाठ्यांकडून नियमबाह्यपणे सातबारा दिले जात आहेत. हे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बघणे आवश्यक आहे. या सर्व प्रकाराची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात शासनाचाही मोठे नुकसान होत आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करून संबंधित तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर राऊत यांनी केली आहे.