लोकमत न्यूज नेटवर्क लाखनी : लाखनीहून पाच किमीवर असलेल्या सिपेवाडा गावात तीन पट्टेदार वाघांनी शिरकाव केलेला आहे. सकाळच्या सुमारास घटलेल्या या घटनेने गावात एकच हाहाकार उडाला. वाघांना बघण्यासाठी ग्रामस्थांची एकच गर्दी केली. मात्र, वाघांच्या दर्शनाने गाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वनपरिक्षेत्र अडयाळ अंतर्गत सहवनक्षेत्र माडगी बिटमधील गाव सिपेवाडा येथे सोगवार सकाळी तीन वाघ गावात भ्रमंती करीत असल्याचे आढळले. आठ दिवसांपूर्वी माडगी जंगल परिसरात तीन वाघाचे लोकांना दर्शन झाले होते. याच प्रकारची पुनरावृत्ती सोमवारला सिपेवाडा गावात झाली. सिपेवाडा येथे पट्टेदार वाघ असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने बचाव पथकाच्या मदतीने वनविभागाचे विशेष पथक घटनास्थळी पाठविले. वाघाला जंगलात शोधण्याची मोहीम सुरू झाली असून, पट्टेदार वाघाला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फञ्जा उडाला. घटनास्थळी सहायक वनक्षेत्र अधिकारी संजय मेंढे, वनपरिक्षेत्राधिकारी सूरज गोखले, उज्ज्वला बागडे, येवतकर, क्षेत्र सहायक जितेंद्र बघेले, दीपक रंगारी, मयूर गायधने, तसेच २० ते ३० वन कर्मचारी व पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळच्या सुमारास त्या पट्टेदार वाघाला हुसकावून लावण्यात वनविभागाला यश आले.