मुख्य मार्गावरील दुकाने हटविली : ग्रामपंचायतीचा पुढाकार, जेसीबीद्वारे कारवाईचिचाळ : येथील गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावरील रस्त्याशेजारील लोकांच्या अतिक्रमणाने वाहनाला अडथळा निर्माण होत आहे. या मार्गाच्या दोन पदरी रस्ता कामाला हिरवी झेंडी मिळाल्याने रस्ता तयार करण्यासाठी जेसीबीने कुणाची ही हयगय न करता अतिक्रमण हटविण्यात आले. ग्रामपंचायतचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र गावातील काही गब्बर अतिक्रमण धारकांचे अतिक्रमणावर केव्हा जेसीबी चालणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.पवनी तालुक्यात क्र. २ ची मोठी ग्रामपंचायत म्हणून चिचाळ संबोधली जाते. गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर काही धनदांडग्यांची खताची दुकाने, पानटपऱ्या, किराणा दुकान, सायकल आदी दुकाने थाटल्याने नाली गिळंकृत झाली आहे. रस्त्यावर सांडपाणी वाहत असते. रस्त्यावर पाणी साचून राहत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. गावात येणारी एस. टी. बस खड््यातील पाणी रस्त्यावरील पादचाऱ्यांवर उडल्याने अनेकदा एस.टी. चालकात खडाजंगी झाली आहे. त्यामुळे काही एस.टी. चालक ती बस गावाबाहेरुनच घेऊन निघून जातात. त्यामुळे प्रवाशांना व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.सन २००२ ते २००७ या कालखंडातील सरपंच मुनिश्वर काटेखाये यांनी अतिक्रमण धारकांना लगाम लावण्यासाठी दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम केले. मात्र ती नाली अतिक्रमण धारकांनी गिळंकृत केल्याने नाली दिसेनासीच झाली आहे. मात्र अतिक्रमण धारकांच्या दबंगगीरीने रस्ताच गिळंकृत झाला. त्यामुळे एस.टी., ट्रॅक्टर, ट्रक ड्रायव्हर यांचे नेहमीच तू-तू, मै-मै झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र ग्राम पंचायत प्रशासनाला संपूर्ण प्रकार डोळ्यासमोर असूनही गाव नाते समोर येत असल्याने अतिक्रमण काढण्यास मागे पुढे पाहत आहेत. सरपंच उषा काटेखाये व ग्रामपचांयत सदस्यांनी कर्तव्याची जान ठेवून व कुणाचीही हयगय न करता तीन वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. अतिक्रमण हटविलेल्या रस्त्यावर जिल्हा परिषदेंतर्गत दलीत वस्ती योजनेतून ७ लक्ष रुपयाचे दुतर्फा रस्त्याचे बांधकामाला प्रारंभ केला आहे. उर्वरित शिल्लक रस्ता येणाऱ्या निधीतून करण्यात येईल. ह्या रस्त्यामुळे अतिक्रमण वाढणार नाही असे सरपंच उषा काटेखाये ‘लोकमत’ला सांगितले. चिचाळ येथे पाथरी गावाचे पूनर्वसन झाल्याने येथे गावाच्या चारही बाजूला माळरान जागा व आबादी शिल्लक राहिलेली नाही. गावाबाहेरील स्मशानभूमी व दफनभुमित ढोरफोडीत एका इसमाचे अतिक्रमण हटविले. मात्र त्या अतिक्रमण धारकांनी पुन्हा ‘जैसे थे’ केल्याने पाळीव प्राण्यांना चराईचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील चक्रधर स्वामी चौक, बाजार चौक, मेहरी बोडी स्मशान भुमी व ढोरफोडीत अतिक्रमण धारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे व गाव विकासात्मक कामात सहकार्य करावे. अन्यथा सदर विषय ग्रामसभेत घेवून ते अतिक्रमण काढण्यास ग्रामस्थ गप्प बसणारनाही याची नोंद त्या अतिक्रमण धारकांनी घ्यावी, असे कळविले आहे.अतिक्रमण काढताना सरपंच उषा काटेखाये, उपसरपंच दिलीप रामटेके, मनोज वैरागडे, देवनाथ वैद्य, अल्का शास्त्रकार, प्रभावती खोब्रागडे, प्रमिला सुखदेवे, ग्राम विकास अधिकारी बावनकुळे, शेखर मेश्राम, भाऊदास हातेल, रामचंद्र काटेखाये, शामलाल रामटेके व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
चिचाळ येथे अतिक्रमण निर्मूलन
By admin | Published: February 03, 2017 12:42 AM