भंडारा : केंद्र व राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन तथा मानवीय दृष्टीकोनातून सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने विचार विनिमय करून एक विशेष बाब म्हणून महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृत्रिम ऑक्सिजन वायू निर्मिती करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीम शक्ती संघटनेने एका लेखी निवेदनातून केली आहे.
मागील वर्षापासून भारत देशातील प्रत्येक राज्यात कोरोना कोविड १९ या जीवघेण्या आजाराने थैमान घातले असून बरेच नागरिक या आजाराने ग्रस्त व त्रस्त आहेत. काही रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासली असताना रुग्णालयात ऑक्सिजन वायू पर्याप्त प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना आपले लाख मोलाचे जीव गमवावे लागत असल्याची ओरड आहे. आपल्या देशात व राज्यात कृत्रिम ऑक्सिजन वायू निर्माण करणारे कारखाने स्थापन करण्यात आले नसल्यामुळे रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन वायूची गरज असताना वेळेवर ऑक्सिजन वायू उपलब्ध होत नसल्याचे सकृतपणे दिसून येत असून ही विज्ञान तंत्रज्ञान युगातील विकसनशील समजल्या जाणाऱ्या भारत देशाची फार मोठी शोकांतिका आहे.
ऑक्सिजन सिलिंडर मिळावेत यासाठी रुग्णांचे नातेवाईक जीवाचा आटापिटा करत आहेत परंतु ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडत असून या भयाण महामारीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. अखेर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी विदेशातून कृत्रिम ऑक्सिजन वायू आयात करण्याची वेळ भारत देशावर आलेली आहे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून देशात व राज्यात कृत्रिम ऑक्सिजन वायू निर्मिती करणारे कारखाने असते तर रुग्णांना जीवदान मिळाले असते.
भारतीय संविधानातील भाग चौथा राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वेमधील कलम ४७ नुसार पोषण मान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य असल्याची तरतूद केली असून याबाबत केंद्र व राज्य शासनाने नागरिकांच्या सुदृढ निरोगी आरोग्यासाठी आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. एवढेच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या वैज्ञानिकांना नवनवीन शोध लावण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात विकसनशील समजल्या जाणाऱ्या भारत देशात ऑक्सिजन व इतर औषधोपचाराच्या अभावी रुग्णांचा मृत्यू होणे . हे साध्या भोळ्या नागरिकांचे मोठे दुर्दैव आहे. विविध आजारामध्ये कृत्रिम ऑक्सिजन गरज भासत असते त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने वेळीच सतर्क होणे काळाची गरज आहे.
याप्रकरणी केंद्र व राज्य शासनाने वेळीच दखल घेऊन देशातील सर्व राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन वायू निर्मिती केंद्र स्थापन करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीम शक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, हर्षवर्धन हुंमने, अरुण ठवरे,उमाकांत काणेकर, मच्छिंद्र टेंभूर्णे, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, अरूणा दामले , पपिता वंजारी, रूपा लेंधारे, शुभांगी भूतांगे, संयोगिता खोब्रागडे, ज्योती मेश्राम, पुष्पा मुल, कल्पना वानखेडे, शारदा रंगारी, विभा रामटेके, माधुरी सुखदेवे, संघमित्रा गेडाम, प्रमिला बोरकर, शर्मिला बोरकर, सरिता टेंभूर्णे, विद्या धारगावे, वर्षा शेंडे, साधना मेश्राम, अनु गेडाम, साधना गोडबोले, तरासान डोंगरे, पंचशीला मेश्राम, रमा धारगावे,कलावती भोवते, विद्या उंदीरवाडे, अर्चना उंदीरवाडे, वनमाला बोरकर, विशाखा बनसोड, सुमन वंजारी, प्रमिला बोरकर यांनी केली आहे.