मच्छी उत्पादक संस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या पत्रपरिषदेत बौद्ध समितीचे विश्वस्त विकास राऊत म्हणाले पवनीला बौद्ध धम्माचा इतिहास असून, उत्खननात सम्राट अशोक कालीन बौद्ध स्तूप मिळाले आहेत. एरवी संपन्न असलेल्या या बौद्धनगरीवर ज्याची सत्ता आली, त्यांनी काळानुसार स्तुपाचे विद्रुपीकरण करून अतिक्रमण केले. बौद्ध धम्माचा भक्कम असा इतिहास असलेल्या पवनी शहरात देशातील पहिले पाली भाषा विद्यापीठ स्थापन केले, तर खऱ्या अर्थाने पाली भाषेला राजाश्रय मिळेल. किंबहुना, भारतातील प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी विदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाली भाषा शिकता येईल, असा आशावाद व्यक्त केला.
पवनीचा इतिहास देदीप्यमान आहे. त्या काळी हिऱ्याचा व्यवसायही या शहरात व्हायचा. या शहरावर सातवाहन, वाकाटक, शक, कलचुरी, यदु, मुस्लीम, गोंड व मराठा यांचे राज्य होते. मौर्यकाळात निर्माण झालेला एक स्तूप जगन्नाथ नावाने अधोरेखित आहे. देशातील बारा स्तुपांपैकी एक आहे. याचा व्यास ४२ मीटर असून, सहाव्या ते सातव्या शतकात तयार झाल्याचे अभ्यासक सांगतात. पुरातत्त्व विभाग व नागपूर विद्यापीठाने केलेल्या उत्खननात मिळालेले शिलालेख, ताम्रपट मुंबईच्या वस्तुसंग्रहालयात व नागपूर येथील अजय बंगल्यात ठेवण्यात आले आहेत. यावरून पवनी बुद्धनगरी होती, हे लक्षात येते. तीन चरणांत बौद्ध धम्माचा प्रसार झाला. भगवान बुद्ध ते सम्राट अशोक काळात झालेल्या बौद्ध धम्म प्रचाराचे प्रतिबिंब उमटले आहे. जागतिक नकाशावर बुद्धनगरी म्हणून पवनीची नोंद आहे. केंद्र शासनाने या परिसराला बुद्धिष्ट सर्किट घोषित केले असून, लवकरच जागतिक पर्यटनस्थळ निर्माणाधीन असल्याचे सांगण्यात येते. भारतातून संपूर्ण जगात गेलेला बौद्ध धम्म पाली भाषेची देण असल्यामुळे पाली भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी पवनीत पाली भाषा विद्यापीठाची मागणी सार्थ असल्याचेही चंद्रमणी बुद्ध विहार कमिटीचे सदस्य विकास राऊत म्हणाले. पत्रपरिषदेला विकास राऊत, प्रा.प्रेमचंद सूर्यवंशी, प्रकाश पचारे इत्यादी उपस्थित होते.