जिल्ह्यात बियाण्यांचे ७०६, रासायनिक खतांचे ८७२ व कीटकनाशकांचे ६२८ असे एकूण २२०६ कृषी सेवा केंद्रे आहेत. या दुकानांची तपासणी करणे, परवान्यात समाविष्ट असलेल्या कंपनीच्या निविष्ठांचीच विक्री होते किंवा नाही, साठा व विक्री दर फलक, साठा पुस्तके यांची तपासणी करून योग्य दर्जाच्या निविष्ठा शेतकऱ्यांना पुरविणे. कोणतीही अनधिकृत बियाणे, खते विक्री होणार नाही, जादा दराने विक्री होणार नाही, शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीची अधिकृत बिले दिली जातात किंवा नाही यावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच भंडारा जिल्ह्यात जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर ७ असे एकूण ८ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
या भरारी पथकाद्वारे कृषी सेवा केंद्रांचा कसून तपास करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व कृषी सेवा केंद्रांनी अधिकृत व परवान्यात समाविष्ट असलेल्या कंपन्याचीच बियाणे, खते व कीटकनाशके विक्री करावी. अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी दिल्या आहेत. येत्या खरीप हंगामामध्ये कमी व मध्यम कालावधीचे भात बियाणे वाणाची लागवड करणे विशेषतः डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या भात बियाणे वाणाची लागवड करणे. अधिकृत मान्यताप्राप्त कंपनीने उत्पादित केलेले भात बियाणे परवानाधारक कृषी सेवा केंद्रांतूनच खरेदी करावे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.