भंडारा : येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्या केशर बोकडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समिती* व निर्भया निर्माण समूहाची स्थापना करण्यात आली. शाळेतील मुलींची संख्या, स्त्री शिक्षक वर्गाचे प्रमाण लक्षात घेता शासनाच्या निर्देशावरुन या समितीचे निर्माण करणे गरजेचे असल्याने ही समिती* स्थापण्यात आली.
मुलींच्या शिक्षणास पाठबळ देणे,समस्यांचे निराकरण करुन शिक्षण व्यवहार सुलभ करण्याच्या उद्देशाने ही समिती कार्यप्रवण राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॅाकडाऊनच्या काळात निर्भया निर्माण हा व्हाॅटस् ॲप समूह निर्माण करण्यात आला होता.पालक,महिला बालसमूपदेशक, बाल कल्याण विभाग अधिकारी, पोलीस अधिकारी,वकील,चाईल्ड लाईन प्रतिनिधींच्या मार्गदर्शनात या समितीचे काम चालणार आहे.
आज शाळेच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते शाळेतील माध्यमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सन्मा. मेधाविनी बोडखे यांची निवड करण्यात आली. निमंत्रित सदस्य म्हणून प्राचार्या केशर बोकडे,शिक्षिका सदस्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका गीता प्रधान,पूर्व माध्यमिक विभागाच्या शिक्षिका सुनीता ढेंगे, विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून नववीच्या विद्यार्थिनी सुहानी बांते,तृप्ती बनपूरकर,साक्षी निखाडे यांची नेमणूक करण्यात आली.
सदस्य सचिव स्मिता गालफाडे यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. निमंत्रित अतिथी सदस्य प्राचार्या केशर बोकडे यांनी समितीच्या निर्माणाचे स्वागत केले व निर्माणाचा उद्देश कथन केला. नवनिर्वाचित अध्यक्ष मेधाविनी बोडखे यांनी कार्यकारिणीच्या आगामी संकल्पांचा उल्लेख करुन महिला व मुलींच्या सुरक्षिततेविषयी कार्यकारिणीच्या कार्यप्रवणतेवर भाष्य केले. मुलींच्या प्रतिनिधींनी शाळेतील मैत्रिणी व छोट्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयत्नात राहू असा निर्धार बोलून दाखवला.
सभेचे सूत्रसंचालन सदस्य सचिव स्मिता गालफाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका प्रतिनिधी सुनीता ढेंगे यांनी केले. महिला मुलींसमोरील संभाव्य समस्या,सामाजिक, कौटुंबिक, आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण,समस्याच उद्भवू नयेत म्हणून घ्यावयाची काळजी यावर मनमोकळी चर्चा करत सभेची सांगता झाली.